भारतातील आजच्या घाडीचे सुपरस्टार्स म्हटले की त्यात एक नाव हमखास सामील असतं ते म्हणजे प्रभास. दक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत आज त्याने जगभरात त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुबली’नंतर प्रभास भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर मात्र त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. प्रभासचे ‘साहो’, ‘राधेश्याम’, ‘आदिपुरुष’ असे तीन सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले.

नुकताच प्रभासचा ‘सालार’ प्रदर्शित झाला परंतु या चित्रपटानेही फारशी कमाई केली नाही. आता प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’ आणि संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबरचा ‘स्पिरीट’ या दोन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. ‘कल्की २८९८ एडी’मधील प्रभासचा फर्स्ट लूकसुद्धा मध्यंतरी समोर आला जो प्रेक्षकांना पसंत पडला. या चित्रपटाचे लंडनमधील चित्रीकरण पूर्ण केल्यावर आता प्रभासने काही काळ ब्रेक घेतल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी त्याने लंडनमध्ये एक घर भाड्यावर घेतले आहे.

आणखी वाचा : “हिंदी चित्रपटसृष्टीने माझ्या…” प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी व्यक्त केली बॉलिवूडविषयी खंत

प्रभास बऱ्याचदा लंडनच्या याच घरात राहिला आहे. २०२३ मध्ये प्रभासच्या युरोपमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली, त्यावेळी त्याने लंडनमध्ये आराम करायचं ठरवलं होतं. यातून पूर्ण बरा झाल्यावरच प्रभास पुन्हा भारतात परतेल असंही त्याने स्पष्ट केलं होतं अन् यासाठीच त्याने लंडनमध्ये घर भाड्यावर घेतलं आहे. या घराच्या भाड्याची किंमत ऐकून थक्कच व्हाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बॉलिवूड लाईफ’च्या रिपोर्टनुसार प्रभासने जे घर भाड्यावर घेतलं आहे त्याचं भाडं जवळपास ६० लाख रुपये दरमहा एवढं आहे. जोवर प्रभास पुढील चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करत नाही तोवर तो लंडनच्या याच घरात राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ‘कल्की २८९८ एडी’नंतर प्रभास संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’वर काम सुरू करणार आहे. २०२४ मध्ये संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटासाठी प्रभासला काही कारणांमुळे वेळ देता येणार नसल्याने ‘स्पिरीट’ पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.