मराठी चित्रपटांना सिनेमासाठी थिएटर्स मिळत नसल्याची खंत हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद खांडेकर यांनी मांडली होती. ‘एकदा येऊन तर बघा’ या सिनेमात प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार यांच्यासह अनेक मराठी कलाकरांच्या भूमिका आहेत. हा मुद्दा आज विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. त्यावर तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं आश्वासन दिलं आहे.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
“अध्यक्ष महोदय, बोरीवलीतले एक कलाकार आहेत प्रसाद खांडेकर. त्यांचा एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा ८ डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे. मात्र सिनेमातले काही बॉस आणि दादा लोक आहेत त्यांनी या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळू देत नाहीत. प्रसाद खांडेकर मराठी तरुण आहे. सामान्य कुटुंबातून आलेला कलाकार आहे. त्यांच्या मराठी सिनेमाला सिनेमागृह तातडीने उपलब्ध करुन द्यावं यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालावं. ” अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी काय आश्वासन दिलं?
“अध्यक्ष महोदय, प्रसाद खांडेकर अतिशय गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. जर त्यांच्या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाईही केली जाईल. मात्र थिएटर उपलब्ध करुन दिलं जाईल.” असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
काय आहे हा चित्रपट?
मराठी कलाविश्वात सध्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १६ दिग्गज कलाकार महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘एकदा येऊन तर बघा’ या फुलंब्रीकर कुटुंबाच्या हॉटेल व्यवसायात कोणकोणते ट्विस्ट येणार? याचा उलगडा ८ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात होणार आहे.
फुलंब्रीकर या सामान्य घरातील कुटुंबाला अचानक २० लाख रुपये मिळतात आणि पुढे हे तिघे भाऊ मिळून एक नवीन हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या हॉटेलमध्ये नेमके कोणते पाहुणे येणार, कथानकात काय ट्विस्ट येणार? एका माणसाच्या मृत्यूनंतर फुलंब्रीकर कुटुंबासमोरच्या अडचणी कशा वाढणार हे सगळे प्रसंग चित्रपटात धमाल, कॉमेडीच्या रुपात पाहायला मिळणार असल्याचं या चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात आलं.