Punjabi Singer Rajvir Jawanda Death : प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जवंदा याचं वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झालं आहे. राजवीर गेल्या ११ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता. मोहाली येथील खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. २७ सप्टेंबरला हिमाचल प्रदेश येथील सोलन जिल्ह्यात त्याचा मोठा अपघात झाला. यावेळी राजवीरच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती.
राजवीर जवंदा बड्डी ते शिमला हा प्रवास मोटरसायकलवरून करत होता. मात्र, प्रवासादरम्यान रस्त्यावरील भटक्या जनावरांमुळे त्याचं मोटारसायकलवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात झाला. सोलन येथे अपघात झाल्यावर राजवीरला तातडीने परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, याचठिकाणी त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर रविवारी पहाटे गायकाला मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं. यावेळी राजवीरची प्रकृती अतिशय गंभीर होती.
रुग्णालयाने निवेदनात म्हटलं आहे की, अपघातात राजवीर जवंदा याच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो व्हेंटिलेटरवर होता. मोहाली येथील रुग्णालयात शिफ्ट केल्यावर, गायकाची तातडीने आपत्कालीन आणि न्यूरोसर्जरी विभागातील डॉक्टरांच्या पथकांनी तपासणी केली होती. त्याची प्रकृती अतिशय गंभीर होती. डॉक्टरांना त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होताना दिसली नाही.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही सोशल मीडियावर राजवीरच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. गायकाच्या अपघातानंतर, अनेक राजकारणी आणि संगीत क्षेत्रातील गायक त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले होते. मात्र, वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नांनंतरही राजवीरच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही आणि अवघ्या ३५ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.
राजवीर जवंदा कोण होता?
लहान वयातच राजवीर जवंदाला सर्वत्र लोकप्रिय मिळाली होती. त्याचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथे झाला होता. तो विवाहित असल्याचं म्हटलं जातं, परंतु त्याच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ‘सरदारी’, ‘जोर’, ‘काली जवंदा दी’, ‘रब्ब करके’, ‘मेरा दिल’ अशी त्याची बरीच गाणी सर्वत्र लोकप्रिय ठरली होती.