दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील गाणी आणि डायलॉग हिट ठरत असल्याचे दिसत आहे. अशातच अल्लू अर्जुनने दिवंगत कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. अल्लू अर्जुनने पुनीतला श्रद्धांजली वाहतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेल आहेत.
अल्लू अर्जुनने पुनीत राजकुमारला श्रद्धांजली वाहत काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने, ‘पुनीतला मी श्रद्धांजली वाहतो. मी राजकुमारच्या कुटुंबीयांचा, मित्रपरीवाराचा आदर करतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. अल्लू अर्जुनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमारचे ऑक्टोबर महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.
