R Madhavan reveals his Ayurvedic secret : भारतीय अभिनेता आर. माधवनच्या जबरदस्त अभिनयाने संपूर्ण देशाला त्याचा चाहता बनवले आहे. भारतात असा क्वचितच कोणी असेल, ज्याला तो किंवा त्याचा अभिनय आवडत नसेल.
आर. माधवन नुकताच ५५ वर्षांचा झाला आहे आणि तो नेहमीसारखाच डॅशिंग लूक देतो. केवळ चित्रपटांमधील त्याच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर त्याच्या आकर्षक, तरुण लूकसाठीही देशभरात ओळखला जाणारा हा स्टार अजूनही लोकांची मने जिंकत आहे.
पण, माधवन त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी प्रसिद्ध आहे. माधवन ५५ वर्षांचा आहे तरीही त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग नाहीत. आता असे बरेच लोक असतील, ज्यांना आर. माधवनसारखी तरुण आणि डागरहित त्वचा हवी असेल. त्यासाठी ते अनेक महागडी रासायनिक उत्पादने वापरतात.
पण तुम्हाला माहीतीआहे का की, माधवन त्याच्या त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांपेक्षा आयुर्वेदावर जास्त विश्वास ठेवतो. हो, त्याने त्याच्या एका मुलाखतीत हे रहस्य उघड केले आहे.
चित्रपटसृष्टीतील अनेक जण महागड्या क्रीम किंवा कॉस्मेटिक फिक्स वापरतात, तर माधवनला सकाळचं कोवळं ऊन घ्यायला आवडतं. GQ शी बोलताना तो म्हणाला, “मी सकाळी कोवळ्या उन्हात गोल्फ खेळतो. हो, मी टॅन होतो; पण त्यामुळे त्वचा घट्ट होण्यास आणि सुरकुत्यामुक्त राहण्यास मदत होते; सूर्य मला सूट होतो.”
तो आर्टिफिशियल ट्रीटमेंट टाळण्याबाबत अगदी स्पष्ट आहे. “आणि मी कोणतेही फिलर्स किंवा एन्हांसमेंट्स केलेले नाहीत; कदाचित कधी कधी एखाद्या भूमिकेसाठी फेशियल करावे लागते. मी फक्त नारळाचे तेल, नारळ पाणी, सूर्यप्रकाश आणि शाकाहारी अन्न खातो.” चित्रपट आणि फॅशन जगत अनेकदा फिल्टर आणि बदलांच्या मागे कसे लपते हेदेखील अभिनेत्याने दाखवून दिले. तो म्हणाला, “कॉस्मेटिक डू-ओव्हर्सनी आपल्या उद्योगात आणखी एक रूप निर्माण केले आहे.”
“सोशल मीडियावरही प्रत्येक जण फिल्टरसह फोटो पोस्ट करत आहे. हा त्यांचा विशेषाधिकार आहे; पण ते खरोखरच त्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रामाणिक नसतात. माझ्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाबद्दल अस्पष्ट असलेल्या इतर सर्व गोष्टींबरोबरच माझे शारीरिक स्वरूप त्यांच्यासारखे असावे, असे मला वाटत नाही”, असे त्याने सांगितले.
माधवनलाही असे वाटते की, तुम्ही जे खाता, त्याने खूप फरक पडतो. तो ताज्या शिजवलेल्या भाज्या, घरगुती जेवण खातो, ही सवय त्याच्या बालपणापासून आहे. शूटिंग करतानाही तो त्याचे जेवण साधे ठेवतो. “मी सेटवर असतानाही मी माझ्या शेफला बरोबर घेऊन जातो; जेणेकरून तो डाळ, भाजी आणि भात असे साधे जेवण बनवेल – जसे माझी आई बनवायची.” तो पुढे म्हणाला, “मला भाताबद्दलचा गैरसमज पटत नाही. माझे आजी-आजोबा ९२ आणि ९३ वर्षांच्या प्रौढ वयापर्यंत जगले आणि ते दिवसातून तीन वेळा भात खात असत.”
‘या’ आयुर्वेदिक पद्धतीमुळे मला खूप फायदा झाला आहे : आर माधवन
माधवनचे केस चाहत्यांना खूप आवडतात. तो म्हणाला, “जेव्हा मी (२००० मध्ये अलाईपायुथे) तमीळ चित्रपटसृष्टीत सुरुवात केली तेव्हा सर्वांनी सांगितले की, मी मिशा नसलेला पहिला तमीळ अभिनेता होतो. आता माझा चेहरा केसांनी भरलेला आहे.”
त्याच्या केसांची काळजीदेखील जुन्या कुटुंब पद्धतींवरून घेतली जाते. तो पुढे म्हणतो, “माझी दिनचर्या अगदी सोपी आहे. लहानपणापासून मी दर रविवारी तिळाच्या तेलाने स्नान करतो. तुम्ही ते तुमच्या संपूर्ण शरीरावर विशेषतः तुमच्या डोक्यावर लावा. इतर दिवशी नारळाचे तेल लावा. या आयुर्वेदिक पद्धतीमुळे मला २० वर्षांहून अधिक काळ चांगली मदत झाली आहे.”