राघव जुयाल हे नाव चित्रपटसृष्टी आणि रिअॅलिटी शोच्या विश्वामध्ये सर्वश्रुत झालं आहे. डान्सर आणि अशा रिअॅलिटी शोचा अँकर असलेला राघव जुयाल त्याच्या स्लो मोशन स्टाईल आणि भन्नाट विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसांपासून हाच राघव जुयाल वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. राघव जुयाल डान्स दिवाने नावाच्या रिअॅलिटी शोमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून राघव जुयालला रेसिस्ट म्हणून टार्गेट केलं जात आहे. यासंदर्भात राघव जुयालनं आज दुपारी त्याचा स्वत:चा स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता त्यानं या शोमधला एक व्हिडीओ पोस्ट करून नक्की काय झालं होतं, हे दाखवलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

कलर्स वाहिनीवरील डान्स दिवाने शोमध्ये राघव जुयालनं एका लहानग्या स्पर्धक मुलीची ओळख गिब्रिश चायनिज भाषेत करून देतो. ही स्पर्धक आसाममधली असून “तिला जी भाषा समजते, त्या भाषेत मी तिची ओळख करून देतो”, असं राघव बोलताना म्हणाला होता. यावरून राघव वर्णद्वेषी पद्धतीने वागत असल्याची टीका त्याच्यावर करण्यात येऊ लागली.

राघवचा खुलासा!

या मुद्द्यावरून राघवनं स्वत:चा एक व्हिडीओ आज दुपारी पोस्ट केला. यामध्ये राघवनं आपली भूमिका मांडली आहे. “तुम्ही हा पूर्ण शो बघा आणि त्यानंतर मला जज करा. माझ्यासाठी आणि जे मला ओळखतात त्यांच्यासाठीदेखील. एक छोटीशी मुलगी आसाममधील गुवाहटीमधून या शोमध्ये आली होती. आम्ही अनेकदा मुलांना विचारतो की तुमचा छंद काय आहे. तुम्ही डान्स तर करायला आला आहात पण इतर काही छंद आहेत का? यावर ती म्हणाली होती की मी गिबरीश चायनीज भाषेत बोलू शकते. माझ्याकडे ते टॅलेंट आहेत. ती हे बोलल्यानंतर आम्ही सर्वजण हसायचो. कारण ती लहान मुलं आहेत त्यांचा छंद काहीही हसू शकतात. जेव्हा गुंजनने आम्हाला सांगितले की ती चायनीज भाषेत बोलू शकते तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आम्ही तिला बोलून दाखव असे सांगितले. तिने बोलून दाखवल्यानंतर हा संपूर्ण किस्सा सुरु झाला”, असं राघव या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

‘त्या’ दिवशीचा व्हिडीओ!

दरम्यान, राघवनं आता नेमका हा प्रकार कुठून सुरू झाला, त्या दिवशीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या स्पर्धकाला तिची आवड विचारल्यानंतर तिने आपल्याला चीनी भाषेत बोलायला आवडतं, असं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याचा संदर्भ घेऊन आपण तिची ओळख करून देताना गिबरीश चीनी भाषा वापरली, त्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं राघवनं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला हा व्हिडीओ पोस्ट करायचा नव्हता. पण हे सगळं वेगळ्याच वळणावर जात होतं. बरं झालं हा व्हिडीओ माझ्याकडे सेव्ह होता. लोक सत्य परिस्थिती माहिती नसताना बोलतात. कृपया संपूर्ण एपिसोड पाहा. कुणालाही एखाद्या छोट्याशा व्हिडीओ क्लिपवरून जज करू नका. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता”, असं या पोस्टमध्ये राघवनं म्हटलं आहे.