Rajkummar Rao Birthday : बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये राजकुमार रावचं नाव घेतलं जातं. चित्रपटसृष्टीत प्रवेश करून सुमारे १५ वर्षे झाली आहेत आणि आज त्याच्याकडे प्रसिद्धी, पैसा आणि सर्व काही आहे. पण, एक काळ असा होता जेव्हा त्याने हे स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली.

राजकुमार रावने रंगभूमीपासून अभिनयाची सुरुवात केली आणि त्यासाठी तो दररोज सायकलवरून अनेक किलोमीटर प्रवास करीत असे. आज त्याच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगणार आहोत.

राजकुमारचा जन्म ३१ ऑगस्ट १९८४ रोजी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये झाला आणि त्याचे वडील महसूल विभागात काम करीत होते. त्याची आई गृहिणी होती. राजकुमारने स्वतः त्याच्या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. एक वेळ अशी आली की, त्याच्याकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते; पण त्याच्या शिक्षकाने त्याला मदत केली आणि शाळेची फी भरली. हे दोन वर्षे चालू राहिले.

दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजकुमारने क्षितिज थिएटर ग्रुप आणि श्रीराम सेंटरबरोबर एकाच वेळी नाटक करायला सुरुवात केली. तो गुरुग्रामहून दिल्लीतील मंडी हाऊसला सायकलवरून थिएटर करण्यासाठी जात असे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, राज कुमारने त्याच्या कामाच्या आवडीबद्दल सांगितले होते, “मला माझे काम आवडते. म्हणूनच मला दररोज सेटवर माझा वेळ घालवायचा आहे. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत आणि त्या मनापासून करायच्या आहेत. कारण- चित्रपट हिट होईल की नाही, हे आपल्या हातात नाही; पण कठोर परिश्रम आपल्या हातात आहेत. १५ वर्षांपूर्वी हा माझा विचार होता आणि आजही तो माझा विचार आहे. जोपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे तोपर्यंत मी त्याबद्दल विचार करतो. एक खास गोष्ट म्हणजे मला माहीत आहे की, माझ्याबरोबर जे घडले ते प्रत्येकाबरोबर घडत नाही. माझे नशीब ज्या प्रकारे चमकले, प्रत्येकाचे नशीब तसे चमकत नाही. गुरुग्राममध्ये बसून चित्रपट अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणे आणि आज येथे पोहोचणे, ही माझ्या कारकिर्दीतील सर्वांत खास गोष्ट आहे.”

जेव्हा तो अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. त्याच्या बँकेमध्ये फक्त १८ रुपये शिल्लक होते. कमी पैशात महानगरात आलेला राजकुमार राव बिस्किटांवर दिवस काढायचा. त्याच्या मनात आवड होती आणि तो कधीही कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटला नाही. त्याने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII)मधून अभिनय शिकला आणि काम शोधू लागला.

राजकुमार रावला २०१० मध्ये राम गोपाल वर्माच्या ‘रन’ चित्रपटात पहिली भूमिका मिळाली. त्याची भूमिका छोटी होती; पण इंडस्ट्रीत प्रवेश करण्यासाठी पुरेशी होती. त्यानंतर त्याला ‘लव्ह सेक्स और धोखा’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले. कमी बजेटच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यानंतर अनुराग बासूने त्याला ‘गँग्स ऑफ वासेपूर २’ ऑफर केले. त्यानंतर त्याला ‘रागिनी एमएमएस २’ व ‘काय पो छे’सारखे चित्रपट मिळाले आणि आज त्याने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी फक्त ११,००० रुपये मिळाले होते; पण आज त्याची एकूण संपत्ती कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. राजकुमारच्या उत्पन्नाचा सर्वांत मोठा स्रोत म्हणजे त्याचे चित्रपट आणि डिजिटल प्रोजेक्ट. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, तो प्रत्येक प्रोजेक्टसाठी पाच ते सहा कोटी रुपये घेतो. अलीकडेच त्याने त्याच्या ‘स्त्री २’ चित्रपटासाठी सहा कोटी रुपये कमावले. त्याशिवाय तो मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून एक ते दोन कोटी रुपये कमावतो. सीए नॉलेजच्या एका अहवालानुसार, राजकुमार रावची अंदाजे एकूण संपत्ती ८१ कोटी रुपये आहे.