रजनीकांत यांनी जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीबरोबर काम केले; परंतु दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबरोबरची त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांना सर्वांत जास्त आवडली होती.

दोघांनीही १९ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यात तमीळ, तेलुगू, कन्नड व हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. सहकलाकार असण्याव्यतिरिक्त दोघेही चांगले मित्र बनले आणि या मैत्रीत एकतर्फी प्रेमदेखील फुलत होते.

रजनीकांत श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले होते. त्यांना त्यांच्याशी लग्न करायचे होते; पण एका छोट्याशा गोष्टीने त्यांच्या मनात एक गैरसमज निर्माण केला आणि त्यांनी कधीही त्यांचे प्रेम व्यक्त केले नाही.

श्रीदेवी यांचे चाहते खूप होते; पण रजनीकांत यांना त्यांच्याबद्दल असलेले प्रेम आजही आठवते. जेव्हा श्रीदेवी चित्रपटांमध्ये काम करू लागल्या तेव्हा त्या फक्त १३ वर्षांच्या होत्या आणि रजनीकांत त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठे होते. त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असल्याने ते श्रीदेवी यांची खूप काळजी घ्यायचे. दोघांमध्येही चांगले संबंध होते, म्हणून रजनीकांत यांना त्यांनी त्यांच्याशी लग्न करावे, असे वाटत होते.

हे काही वर्षे चालू राहिले आणि जेव्हा श्रीदेवी १६ वर्षांच्या झाल्या, तेव्हा रजनीकांत श्रीदेवी यांच्या आईला लग्नासाठी बोलणार होते. श्रीदेवी यांचा गृहप्रवेश समारंभ होता, ज्यामध्ये रजनीकांत यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. लग्नाबद्दल बोलण्यासाठी यापेक्षा चांगला प्रसंग असू शकत नाही, असे त्यांना वाटले. ते पूर्ण निर्धाराने श्रीदेवी यांच्या घरी गेले; पण नंतर लाईट गेली. रजनीकांत यांना हा एक वाईट संकेत आहे, असे वाटले. त्यामुळे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत आणि ते परतले. त्यानंतर त्यांनी कधीही आपले प्रेम व्यक्त केले नाही.

या काळात चित्रपट निर्माते के. बालचंदरदेखील रजनीकांत यांच्याबरोबर होते. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत ती घटना आणि त्यांचे श्रीदेवीवरील प्रेम याबद्दल सांगितले होते. त्यांनी सांगितले की, ते श्रीदेवीवर खूप प्रेम करीत होते; परंतु लाईट गेल्याने त्यांना तो वाईट संकेत वाटल्याने त्यांनी कधीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या नाहीत. परंतु, त्यानंतरही त्यांनी श्रीदेवी यांच्याशी असलेली मैत्री कायम ठेवली.