सध्या बॉलिवूडचा ‘कूल बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंग त्याच्या ‘पद्मावत’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयामुळे सर्व क्षेत्रातून त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. नुकतेच रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रणवीर स्वित्झर्लंडमध्ये क्रिकेट खेळताना उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे. एवढेच नाही तर आमिर खानच्या ‘लगान’ सिनेमातील गाण्याचे पाश्वसंगीतही मॅच दरम्यान ऐकू येतं.

छायाचित्रकार रोहन श्रेष्ठच्या गोलंदाजीवर रणवीर आक्रमक फलंदाजी करत होता. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर रणवीर एखाद्या कसलेल्या खेळाडूसारखा षटकार मारताना दिसला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहणं कोणत्याही करमणुकीपेक्षा कमी नाही. या व्हिडिओतही तो नेहमीप्रमाणे त्याच्या सभोवतालच्या व्यक्तिंचे मनोरंजन करताना दिसतो.

https://www.instagram.com/p/Be1zywbhHS0/

रणवीरला सगळेच खेळ आवडतात, पण त्यातही तो क्रिकेटला नेहमीच झुकते माप देतो. खेळासाठीच्या याच प्रेमामुळे तो इंग्लिश प्रीमिअर लीगचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. देशात तसेच परदेशात होणाऱ्या अनेक खेळांचे सामने पाहायला तो आवर्जुन जातो. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावत’ सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे.

एकीकडे आपल्या प्रत्येक सिनेमातून तो प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आता तो त्याच्यातील फलंदाजीचे गुण दाखवून मुलींना वेडं करत आहे. व्हिडिओत रणवीर इंग्रजीमध्ये समालोचन करतानाही दिसला. त्याचा हा व्हिडिओ सिद्धार्थ अग्रवाल नावाच्या एका युझरने यू-ट्युबवर शेअर केला.