कन्नड अभिनेत्री रान्या रावला ४ मार्च रोजी बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली होती. यावेळी तिची झडती घेण्यात आली असता तिच्याजवळ तब्बल १४.८ किलो सोनं आढळून आलं होतं. या प्रकरणी अभिनेत्री रान्या रावला मंगळवारी (२० मे) रोजी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणातील रान्याचा सह-आरोपी तरुण कोंडाराजू यांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन जामीनदार आणि प्रत्येकी २ लाख रुपयांचा जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय, इतर काही अटी आहेत. यानुसार, जामीन मिळाला असूनही अभिनेत्री कोठडीतच राहील. या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती विश्वनाथ सी. गौडर यांनी जामीन अर्ज मंजूर केला.

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, रान्या रावचे वकील बी.एस. गिरीश यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, अभिनेत्रीला जामीन मिळाला तरी तिची सुटका होणार नाही, कारण तिच्याविरुद्ध परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायदा, १९७४ (COFEPOSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयाने सर्व सुनावणीच्या तारखांना न्यायालयात हजर राहणे, चालू तपासात पूर्ण सहकार्य करणे आणि पुराव्यांशी छेडछाड करण्यास किंवा साक्षीदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करण्यास मनाई अशा काही अटी घातल्या आहेत. तसंच या सर्व अटींचे उल्लंघन केल्यास तिचा जामीन रद्द केला जाईल असा इशारादेखील न्यायालयाने दिला आहे.

रान्या रावविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक कायदा, १९७४ (COFEPOSA) या खटल्याबद्दल अभिनेत्रीच्या आईने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर उच्च न्यायालयात येत्या ३ जून रोजी सुनावणी होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या रावला ४ मार्च रोजी दुबईहून परतताना बेंगळुरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या १४.२ किलो सोन्यासह अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आणि २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आलं होतं.