उत्तुंग प्रतिभा आणि लोकप्रियता असणाऱ्या व्यक्तिंच्या पुढील पिढीतील कर्तबगार व्यक्ती दुर्देवाने झाकली अथवा खुंटली जाण्याची दाट शक्यता असते. पण दिग्दर्शक रवि चोप्रा याच्याबाबत तसे झाले नाही, सामाजीक चित्रपटाचे प्रणेते बी. आर. चोप्रा यांचा एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर प्रचंड दबदबा होता. त्यामुळे त्यांचा पुत्र रवि चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आला त्यावेळी त्याला स्वत:ची ओळख निर्माण करता येईल का याबाबत काहीना शंका होती. पण ‘तुम्हारी कसम’ या चित्रपटापासून स्वतंत्रपणे दिग्दर्शन करताना रवि चोप्रानेही आपल्याला सामाजिक जाणिव आहे आणि या दृश्यमाध्यमावरही आपली पकड आहे याची जाणिव करून दिली. आपले काका यश चोप्रा यांच्याकडे ‘इक्तफाक’पासून सहायक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करणाऱ्या रवि चोप्राने कालांतराने स्वत:चा ठसा उमटवला. घरच्याच ‘बी. आर. फिल्म’च्या ‘जमीर’साठी अमिताभ बच्चन-सायरा बानू अशी जोडी जमवताना त्याने शम्मी कपूरला चरीत्र भूमिकेद्वारे पुनरागमनाची संधी देत सायरा बानूच्या पित्याच्या भूमिकेत सादर केले. विशेष म्हणजे, फार पूर्वी याच सायरा बानूने सुबोध मुखर्जी दिग्दर्शीत ‘जंगली’मध्ये शम्मी कपूरची नायिका म्हणून रुपेरी पदार्पण केले होते. ‘कल की आवाज’मधील भूमिका साकारताना नाना पाटेकरचा कशावरून तरी गोंधळ होत असताना स्मिता पाटीलनेच पुढाकार घेत रवि चोप्राकडे शब्द टाकत नानाच्या हातातून ही मोठी संधी जावू दिली नाही. रविने कधी स्वतंत्रपणे तर कधी पित्यासह चित्रपट दिग्दर्शन केले. ‘मजदूर’, ‘दी बर्निंग ट्रेन’, ‘तवायफ’, ‘बागबान’, ‘बाबुल’, ‘सरपरस्त’, ‘भूतनाथ’ अशी त्याच्या चित्रपटांची संख्या वाढली. ‘महाभारत’ या मालिकेची निर्मिती हा एकूणच ‘बी. आर. फिल्म’ बॅनरचा सर्वोच्च क्षण ठरला. दिलीप कुमार, अमिताभ, राजेश खन्ना, नंदा, हेमा मालिनी, राणी मुखर्जी अशा कितीतरी आघाडीच्या कलाकारांसोबत दिग्दर्शन करतानाही त्यानी आपले सामाजिक आशयाचे वैशिष्ट्य जपले. ‘बागबान’च्या चित्रनगरीतील चित्रीकरणाच्या वेळी रवि चोप्राच्या विशेष मुलाखतीचा योग आला असता तो फिल्मी वाटला नाही. यशानंतरही तो कमालीचा संतुलित वाटला. जुहू येथील त्याच्या बंगल्यातच असलेल्या मिनी थिएटरमध्ये ‘नया दौर’च्या रंगीत स्वरुपाचे स्क्रिनिंग अनुभवले. त्या बंगल्याच्या हिरवळीवरील पार्टीत रवि चोप्राने प्रत्येकाची आस्थेने विचारपूस केली. हे आता सगळे आठवणीत राहिले आहे.