परमप्रिय पूर्णा आजी,
१६ ऑगस्ट संध्याकाळची वेळ… अचानक एक इन्स्टाग्राम पोस्ट दिसते अन् काळजाचा ठोका चुकतो. “सर्वांची लाडकी पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली” मन विश्वास ठेवायला तयार नसतं पण, वास्तव स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो…

तरुणांना लाजवेल अशी एनर्जी, ६९ व्या वर्षी प्रकृती बरी नसतानाही डेलीसोपमध्ये काम करणं, सेटवर सतत हसत-खेळत वावरणं, प्रत्येक सीन त्याच ताकदीने करणं हे सारं काही तूच करू शकलीस. बरं, विशेष म्हणजे तू सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असायचीस. सेटवरच्या मेकरुपमधील डान्सचा व्हिडीओ असो किंवा लेक तेजस्विनीसोबतचे फोटो; तू चाहत्यांबरोबर सर्वकाही शेअर केलंस. सगळ्यांना इतकं आपलंसं केलंस की, आता तुझ्याशिवाय ही मालिका कशी पाहायची?, असा भाबडा प्रश्न मलाच नव्हे तर अनेक रसिकांना पडलाय.

सुरुवातीला मालिकेत सायलीचा तिरस्कार करणारी, नंतर तिला सून म्हणून स्वीकारणारी…कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटल्यावर सायली-अर्जुनला त्याच कणखरतेने जाब विचारणारी, केसचा अंतिम निकाल लागल्यावर तेवढ्याच मोठ्या मनाने सायलीची माफी मागणारी आणि शेवटी प्रियाला कोर्टासमोर सणसणीत कानाखाली वाजणारी पूर्णा आजी! तू मालिकेत सायलीला शब्द दिला होतास की, कल्पनाचं मतपरिवर्तन मी करेन जेणेकरून ती तुझा स्वीकार करेल. आता पूर्णा आजी नातसुनेसाठी काय-काय करणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते पण… सगळंच संपलं!

अर्थात, ‘शो मस्ट गो ऑन’ हे तत्त्व इथेही लागू पडेल…तुझ्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट येईल किंवा येणारही नाही तो वेगळा भाग… पण, तू साकारलेली पूर्णा आजी कायम मनात राहणार, ती जागा यापुढे कोणीही घेऊ शकत नाही.

एक प्रेक्षक म्हणून, पूर्णा आजी तुझ्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या होत्या… यात मनाला भावलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ६८ व्या वर्षी स्वत:ची गाडी खरेदी करणं. तू एक पाऊल उचललंस आणि अनेकांना प्रेरणा देऊन गेलीस. वय कितीही असूदेत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायच्या आणि आपल्याला हवं तसं बिनधास्त आयुष्य जगावं. अगं आजी, फार कमी जणांना हे जमतं त्यातलीच तू एक!

‘मी सिंधुताई सपकाळ’ या सिनेमाच्या निमित्ताने तुझी मुलगी तेजस्विनी आणि तू अशा तुम्ही दोघींनी सिंधुताईंच्या आयुष्यातील दोन विविध पर्वातील भूमिका साकारल्या. सर्वत्र कौतुक झालं, तुम्हा दोघींना अनेक पुरस्कारही मिळाले. तेव्हा तेजस्विनी म्हणाली होती, “आमची आई आमचं घर सांभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन, अनेक बलिदानं देऊन स्वतःचं अस्तित्व घडवत होती आणि तिला मानाचा पुरस्कार स्वीकारताना पाहून संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो.” यावरून ज्योती चांदेकर ते पूर्णा आजी हा जवळपास ५३ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास किती मोठा, प्रगल्भ आणि तेवढाच संघर्षमय होता, याची जाणीव होते…

ज्योती चांदेकर असो, तू साकारलेली सिंधुताई असो किंवा मग पूर्णा आजी… तुझी कोणतीच ओळख, कोणतीच भूमिका कधीच पुसली जाणार नाही! त्यामुळे इथून पुढे तुझ्याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिका पाहणं खूपच जड जाईल.

“अगं कल्पना ऐकतेस का?”, “अर्जुन समजाव तुझ्या बायकोला”, “सायलीवर माझा पूर्ण विश्वास आहे…” हे सगळे तुझे मालिकेतील संवाद… तुझ्या आवाजाची जरब, स्क्रीनवर झळकणारी ती कणखरता याविषयी मी पामर काय बोलणार? पण, प्रश्न इतकाच आहे तुझ्याशिवाय मालिका कशी पाहायची?