Kantara Chapter 1 box office collection Day 8: दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा’चा प्रीक्वल ‘कांतारा: चॅप्टर १’, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २०२२ मध्ये ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिस गाजवलं. आता तीन वर्षांनी या चित्रपटाचा प्रीक्वल धुमाकूळ घालतोय. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर एका आठवड्यात हा सिनेमा जगभरात ५०० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे.

भारतात ‘कांतारा: चॅप्टर १’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद उत्तम आहेच, पण जगभरातही या चित्रपटाची क्रेझ आहे. ‘कांतारा: चॅप्टर १’ ने मूळ कन्नड भाषेपेक्षा हिंदी भाषेत जास्त कमाई केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, कांतारा: चॅप्टर १ ने आठव्या दिवशी संपूर्ण भारतात २० कोटी रुपये कमावले. रिलीजनंतरची ही या सिनेमाची एका दिवसातील सर्वात कमी कमाई आहे. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हा चित्रपट अजूनही चांगली कमाई करत आहे. आठवड्याच्या शेवटी त्याच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लवकरच कांतारा: चॅप्टर १ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल.

कांतारा चॅप्टर १ चे भारतातील कलेक्शन

कांतारा: चॅप्टर १ चित्रपटाची सध्याची भारतातील कमाई ३३५ कोटी रुपये आहे. या एकूण कमाईपैकी १०० कोटींहून अधिक रक्कम फक्त हिंदीत डब केलेल्या सिनेमातून आली आहे. बाहुबली २: द कन्क्लुजन या सिनेमाची जशी हिंदी प्रेक्षकांमध्ये क्रेझ होती, तशीच क्रेझ कांतारा: चॅप्टर १ ची उत्तर भारतात दिसतेय.

जगभरात ‘कांतारा: चॅप्टर १’ ने ४७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि लवकरच तो ५०० कोटींचा टप्पा ओलांडेल, असं दिसतंय. जगभरातील बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतच्या टॉप २५ भारतीय चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी, ‘कांतारा: चॅप्टर १’ ला अजून ८० कोटी रुपयांची कमाई करावी लागेल. या वीकेंडला तेवढी कमाई हा चित्रपट करेल, अशी शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘सैयारा’ ने जगभरात ५७० कोटी रुपये कमाई केली, तर ‘छावा’ ने फेब्रुवारी महिन्यात जगभरात ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कन्नड भाषेतील चित्रपट ‘केजीएफ: चॅप्टर २’ आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.

‘केजीएफ’ व ‘कांतारा’ या दोन्ही फ्रँचायझींनी कन्नड चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे. दोन्ही सिनेमांचे दुसरे भागही ब्लॉकबस्टर ठरले. त्यामुळे या फ्रँचायझीच्या आगामी सिनेमांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दोन्ही चित्रपटांना मिळालेलं यश पाहता ‘कांतारा’ फ्रँचायझीचे आणखी चित्रपट पुढे येतील, अशी शक्यता आहे.