सध्या देशामध्ये करोनामुळे लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. मात्र या गरजुंच्या मदतीसाठी अनेकांनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यात काही सेलिब्रिटी मंडळींचाही समावेश आहे. त्यातच आता गरजुंसाठी अहोरात्र झटणाऱ्या चित्रपट महामंडळाला अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी आर्थिक मदत केली आहे.
लॉकडाउनमुळे कलाविश्वातील कामकाजदेखील ठप्प झालं असून या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ या गरजुंना आर्थिक तसंच अन्नधान्य पुरवून मदत करत आहे. आतापर्यंत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून २ हजार गरजुंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता गरजुंची संख्या वाढत असल्यामुळे महामंडळाने कलाविश्वातील सेलिब्रिटींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे महामंडळाने केलेल्या या आवाहनाला रितेश-जेनेलियाने मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
रितेश आणि जेनेलियाने मुंबई फिल्म या कंपनीतर्फे १० लाख रुपयांची मदत केली आहे. तसंच त्यांनीदेखील कलाविश्वातील अन्य सेलिब्रिटींना आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान अ.भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी रितेश आणि जेनेलियाचे आभार मानले आहेत.