येत्या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर.’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटात शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा दाखवण्यात येणार. या चित्रपटात खऱ्याखुऱ्या आयुष्यातील कपल अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांना पुन्हा एकत्र पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात अजय तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे तर त्यांच्या पत्नीची सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका काजोल वठवणार आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी चित्रपट निर्माते आणि चित्रपटातील कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. काजोल या कार्यक्रमाला अनुपस्थित होती. चित्रपटात महत्त्वाची भूमिका असूनही काजोल ट्रेलर लाँचवेळी का आली नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहीत शेट्टीने काजोलच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे.

‘जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला दिसेल की तान्हाजी हे आपल्या मुलाचे लग्न सोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवलेले कार्य करण्यासाठी, लढाईसाठी निघून जातात. त्याच प्रमाणे काजोल तिचे कर्तव्य पार पाडत आहे. ती सध्या सिंगापूरमध्ये आहे. तिची मुलगी न्यासा सिंगापूरमध्ये शिक्षण घेते आहे आणि तेथील एका कार्यक्रमात उपस्थित राहणे गरजेचे होते. म्हणून काजोलला सिंगापूरला जावे लागले’ असे रोहित शेट्टीने सांगितले आहे.

आणखी वाचा : ‘तान्हाजी’मधील काजोलचा फर्स्ट लूक पाहिलात का?

अजय आणि काजोलला १६ वर्षांची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमधील युनायडेट वर्ल्ड कॉलेज ऑफ साऊथ इस्ट एशियामध्ये शिकत आहे. या संस्थेचे स्वतंत्र बोर्डिंग असून तेथे राहण्याचीही सोय होती. परंतु न्यासाला स्वतंत्र राहायचे होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अजय-काजोलने तिच्यासाठी सिंगापूरमधील एका उच्चभ्रू वस्तीत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तान्हाजी’ चित्रपटात काजोल आणि अजय व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, मराठमोळा अभिनेता शरद केळकर आणि पद्मावती रावदेखील दिसणार आहे. सैफ राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वठवणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे.