बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान सिनेसृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे. सिनेवर्तुळातून होत असलेल्या चर्चेनुसार ‘स्टुडंट ऑफ दि इअर २’ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण साराची आई अमृता सिंगने मात्र ही फक्त अफवा असल्याचे म्हटले आहे. सैफ अली खानने एचटी कॅफेशी संवाद साधताना साराच्या पदार्पणाबद्दलही चर्चा केली.

सैफने सांगितले की, मी सध्या फार खूश आहे. माझं आणि माझ्या मुलीचं नातं खूप चांगलं आहे. मी तिच्यासाठी एक मार्गदर्शक, योग्य निर्णय घेण्यात मदत करणारा असा मित्र आहे. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा करतो. आम्ही सुट्ट्यांसाठी इटलीलाही गेलो होतो. तिकडे आम्ही कला, आयुष्य आणि सिनेमे अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली. मी तिला काही गोष्टींबद्दल माझे मतही सांगितले. मी तिला सांगितले की, कोणी काहीही लिहू दे, त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. हे मी सगळे शिकलो आहे आणि जेव्हा मी मुंबईत आलो होतो, तेव्हा तुझ्या आईने (अमृता सिंग) मला खूप काही शिकवले होते.

सैफने सांगितले की, सारा जेव्हा दोन वर्षांची होती तेव्हा पासून तिला एक अभिनेत्री बनायचे होते. पण मी तिला सांगितले की आधी आपले शिक्षण पूर्ण करायचे. साराने अमेरिकेत थिएटरही केले आहे. एक ग्लॅमरस क्षेत्र म्हणून ती याकडे पाहत नाही. ती अभिनय करणं एन्जॉय करते.
सारा माझी ताकद आणि मला मिळालेला आशिर्वाद आहे. तिच्या आणि माझ्या वयात फार कमी अंतर आहे. त्यामुळे आम्ही अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने चर्चा करु शकतो. मी साराच्या बाबतीत कधीच सक्त भूमिका घेत नाही. आम्ही खूप बोलतो आणि प्रत्येक संभाषण एन्जॉयही करतो.

मध्यंतरी अशीही चर्चा अशीही होती की, सारा तिचा पहिला सिनेमा बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत करेल. या सिनेमाचे दिग्दर्शन गौरी शिंदे करणार असल्याचेही म्हटले जात होते. ‘गल्ली बॉय’ या नावाने बनण्यात येणारा हा सिनेमा मुंबईतल्या गल्लीतल्या एका मुलाची गोष्ट असणार आहे. रणवीर यात एका रॅपरची भूमिका साकारताना दिसेल.