‘सैराट’ची ११ दिवसांत ४१ कोटी रुपयांची कमाई

आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट तिकीटबारीवर वेगाने कमाईचे नवनवे विक्रम करतो आहे. राज्यभरात सध्या ४५६ चित्रपटगृहांमधून दाखवल्या जाणाऱ्या या चित्रपटाने केवळ ११ दिवसांत ४१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ चित्रपटाने तीन आठवडय़ांत ४० कोटींची कमाई केली होती. ‘सैराट’ने कमीतकमी दिवसांत हा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून आपले नाव कोरले आहे.

आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. दुसऱ्या आठवडय़ात या चित्रपटासाठी ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ या हॉलीवूडपटामुळे काहीशी स्पर्धा निर्माण झाली होती, मात्र राज्यापुरता विचार करायचा झाला तर सध्या सगळ्या एकपडदा चित्रपटगृहांमधून केवळ ‘सैराट’ सुरू आहे. याही आठवडय़ात ‘अझर’ वगळता दुसरा कोणताही मोठा हिंदी चित्रपट नाही आणि मराठी चित्रपटही नाही. त्यामुळे ‘सैराट’ला हा आठवडा तिकीटबारीवर वेगाने पुढे जाता येईल. हा मराठी चित्रपट किती मोठी कमाई करणार, याकडेच चित्रपटरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sairat movie break natsamrat movie record