‘रिमेक’साठी कलाकारांच्या निवडीची घोषणा; इशान खत्तार ‘परश्या’, तर जान्हवी कपूर ‘आर्ची’?

हिंदीतील बिग बजेट सिनेमांनाही दरदरून घाम फोडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’चा हिंदी रिमेक येणार असल्याची चर्चा सध्या बॉलीवूडच्या वर्तुळात जोर धरत आहे. करण जोहरच्या ‘धर्मा’ प्रोडक्शनतर्फे या चित्रपटाची निर्मिती होणार असून आर्चीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिची निवड झाल्याचेही बोलले जात आहे. परंतु प्रत्यक्षात ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे ‘कॉपीराइट’ (स्वामित्व हक्क) विकले गेले नसतानाच ही सगळी तयारी सुरू झाल्याचे उघड झाल्याने या ‘करणी’ मागे कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपट ठरला आहे. नागराज मंजुळे, ‘झी स्टुडिओ’ आणि ‘एस्सेल व्हिजन’ यांची एकत्रित निर्मिती असलेला हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ ला प्रदर्शित झाला होता. राज्यभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि सर्वाधिक काळ चाललेला तसेच जवळपास शंभर कोटी रुपये कमाई करणारा पहिला चित्रपट म्हणून ‘सैराट’ची नोंद झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचा विचार झाला नसता तरच नवल! निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने हिंदी रिमेकसाठी चित्रपटाचे कॉपीराइट्स विकत घेतल्याचे बोलले जात आहे. ‘सैराट’च्या यशात चित्रपटातील दोन प्रमुख नवीन कलाकार आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे हिंदीत रिमेक करण्यासाठीही त्याच पद्धतीने नवीन कलाकार शोधले जात आहेत. परश्याच्या भूमिकेसाठी अभिनेता शाहीद कपूरचा सावत्र भाऊ इशान खत्तार आणि अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही हिंदी ‘सैराट’च्या निमित्ताने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. मात्र ‘धर्मा प्रॉडक्शन’कडून हिंदी चित्रपट वर्तुळात या गोष्टी सोडल्या जात असल्याचे ‘सैराट’शी संबंधित सूत्रांनी सांगितले. ‘सैराट’च्या हिंदी रिमेकचे हक्क अजून विकले गेलेले नाहीत. यासंबंधी करण जोहर यांच्याशी प्राथमिक बोलणी झाली होती, पण त्यानंतर धर्मा प्रॉडक्शनकडूनही यासंदर्भात काहीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

स्वामित्व हक्काची विक्री नाही

हिंदी रिमेकसाठी ‘सैराट’चे कॉपीराइट्स विकले जाणे ही मराठी चित्रपटांच्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना आहे. या चित्रपटाचे हक्क विकत घेण्यासाठी करण जोहरला मोठी किंमत मोजावी लागणार हेही उघड आहे. पण अद्याप तरी हिंदीसाठी चित्रपटाचे कॉपीराइट्स विकले गेलेले नाहीत. याआधी चित्रपटाच्या कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ रिमेकची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्याचे हक्क दक्षिणेतील बडे निर्माते रॉकलाइन वेंक टेश यांनी विकत घेतले असून त्याचे दिग्दर्शन नागराजच करणार आहेत. तर आर्चीची भूमिका रिंकू राजगुरूच करणार असल्याचेही आधी जाहीर करण्यात आले आहे.