मनोरंजन विश्वातील झगमगाटामधील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे कास्टिंग काऊच. मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव आला आहे. पूर्वी अभिनेत्री अशा प्रसंगांबद्दल व्यक्त होत नसत. पण आता अभिनेत्री त्यांच्याबरोबर घडलेल्या या घटना स्वत:हून सांगतात. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी कास्टिंग काऊचसारख्या प्रसंगांचा सामना करावा लागला आहे.

यात अनेक हिंदीसह मराठी अभिनेत्रींचाही समावेश आहे. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री सैयामी खेरलाही असाच एकदा कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. विशेष म्हणजे तिला एका महिलेनेच असं करायला सांगितलं होतं. स्वत: सैयामीने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

यावेळी सैयामी असं म्हणाली, “मी तेव्हा १९ वर्षांची होते. तेलुगू चित्रपटासाठी मला एका एजंटचा फोन आला होता आणि ती महिला होती. तेव्हा ती मला ‘कॉम्प्रोमाईज’ करावं लागेल म्हणाली. एक महिलाच असं सांगत आहे, हे ऐकून मला धक्काच बसला होता. मी तिला म्हटलं, ‘मॅडम… तुम्ही काय सांगत आहात हे मला कळत नाहीय’. तरीही ती महिला त्यावर जोर देत तेच विचारत राहिली.”

यापुढे सैयामी खेरने सांगितलं, “शेवटी मी तिला स्पष्ट केलं की, मी तशी मुलगी नाही, जी काम मिळवण्यासाठी हा मार्ग स्वीकारेल. मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडणार नाही. मला एकदाच कास्टिंग काऊचचा असा अनुभव आला आणि त्याबद्दल एका महिलेकडून विचारण्यात आल्याचा मला धक्का बसला होता.”

यापुढे सैयामी खेरने सांगितलं, “मी तीन दाक्षिणात्य चित्रपट केले आहेत. नागार्जुन सरांबरोबर मला काम करायला मिळालं. सुदैवाने मला हिंदीत कधीच असा अनुभव आला नाही. मला ज्या ज्या संधी मिळाल्या त्यासाठी मी स्वतःला नशिबवानच समजते.” दरम्यान, सैयामी खेरने रितेश देशमुखबरोबर ‘माऊली’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय सैयामी खेर ‘घूमर’ या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि अंगद बेदीबरोबर दिसली होती. तसेच ती ‘शर्माजी की बेटी’ या चित्रपटात साक्षी तन्वर, दिव्या दत्ता यांच्यासह प्रमुख भूमिकेत झळकली होती. तसंच अभिनेत्रीने ‘मिर्झ्या’, ‘अग्नी’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.