अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि तिच्या कॉलेजमधील काही सहाध्यायींनी त्यांच्या १६ वर्षांनी झालेल्या रियुनियनचा भाग म्हणून विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक मोजक्या प्रयोगांसह सादर केलं. त्याविषयी..

प्रत्येक नाटक आपलं नशीब घेऊन जन्माला येत असतं. उदाहरणार्थ सखराम बाइंडर! नाटककार विजय तेंडुलकरांचं हे नाटक. १९७२ मध्ये रंगभूमीवर सादर झालेलं. म्हणजे आज ४५ वर्षे झाली. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर प्रचंड विरोध, मोठमोठे वाद, बंदी आणि कोर्टकचेऱ्या असं सगळं वादळ अनुभवलेल्या या नाटकाला आणि त्याच्याशी संबंधित लोकांना याच नाटकासाठी तितकंच टोकाचं प्रेमही अनुभवायला मिळालं. आणि तेही फक्त तेव्हाच नव्हे, तर आज ४५ वर्षांनंतर अभिनेत्री निर्माती मुक्ता बर्वे आणि ललित कला केंद्रातल्या तिच्या १६ वर्षांपूर्वीच्या सहाध्यायींनी पुन्हा एकदा ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक मोजक्या पाच प्रयोगांसह सादर केलं तेव्हाही तितकाच कौतुकाचा, प्रेमाचा वर्षांव त्यांच्यावर झाला.

हे प्रेम सखाराम बाइंडरचं होतं का? की मुक्तावरचं होतं? की नाटककार विजय तेंडुलकरांवरचं होतं? ते या सगळ्यांसकट मराठी नाटकावरचं होतं. आणि अगदी खरं सांगायचं तर ‘सखाराम’च्या वाटय़ाला ते अंमळ जास्तच आलं. मध्ये इतका काळ गेल्यानंतरही ते ओसरलं नाही हे विशेष.

म्हणूनच मुक्ता बर्वे आणि सहाध्यायींनाही ते पुन्हा सादर करावंसं वाटलं. इथे पुन्हा या शब्दाला खरोखरच वेगळा अर्थ आहे. या टीमने १६ वषरापूर्वी पुण्यातल्या ललित कला केंद्रात नाटक शिकत असताना ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक परीक्षेचा भाग म्हणून केलं होतं. अलीकडे त्यांचं रीयुनियन झालं तेव्हा नुसतं भेटण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यावेळी केलेलं ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक त्याच मंडळींनी पुन्हा करायचं ठरवलं. या पाच प्रयोगांमधून उभा राहिलेला निधी रंगमंच कामगार अर्थात बॅकस्टेज आर्टिस्टना द्यायचा असंही ललित कला केंद्राच्या या माजी विद्यार्थ्यांनी ठरवलं. मुक्ताचा स्वत:चा असा एक प्रेक्षक वर्ग असल्यामुळे ती हे नाटक करणार आणि त्यात चंपाची भूमिका करणार म्हटल्यावर नव्या-जुन्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नाटक पाहताना अनेकांच्या स्मृतिपटलावर तो सगळा धकाधकीचा काळ पुन्हा एकदा ताजा झाला.

‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकात ‘सखाराम’चे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी तो शब्दबद्ध केला आहे. वर्ष होतं १९७२ं. तेंडुलकरांनी आपलं ‘सखाराम बाइंडर’ हे नवं कोरं नाटक कमलाकर सारंग या नवीन तुलनेत अननुभवी दिग्दर्शकाला दिलं.  वाचणाऱ्या प्रत्येकाला ते आवडत होतं. काहीतरी वेगळं आहे, हे जाणवत होतं. डॉ. श्रीराम लागूंनाही ‘सखाराम’ करायचं होतं. पण कमलाकर सारंग यांचंच पारडं जड ठरलं. सखारामच्या भूमिकेसाठी निळू फुले, लक्ष्मीच्या भूमिकेत कुमुद आणि चंपा लालन सारंग असे  कलाकार ठरले. तालमी होऊन पहिला प्रयोग झाला. रंगमंचावर चंपा साडी बदलते असं दृश्य अत्यंत सूचकपणे दाखवलं गेलं होतं. तरीही ते दृश्य, सखारामच्या, चंपाच्या तोंडची भाषा, शिव्या हे सगळं बघून प्रेक्षक अवाक्  झाले. रंगभूमीवर यापूर्वी त्यांनी असं काही पाहिलेलंच नव्हतं. मध्यमवर्गीय बाजाची, कौटुंबिक मनोरंजन करणारी नाटकंच त्यांना परिचित होती. पण ‘सखाराम’ने त्यांच्या सगळ्या फूटपट्टय़ा मोडूनतोडून टाकल्या होत्या.

नवं काही स्वीकारण्याची, प्रयोग समजून घेण्याची क्षमता असलेल्या प्रेक्षकांना नाटक जबरदस्त आवडलं. माधव मनोहर यांच्यासारख्या दिग्गज समीक्षकांनेही दिग्दर्शक कमलाकर सारंग यांची पाठ थोपटली. पण तरीही ज्यांना हे सगळं पचलं, रुचलं नव्हतं, त्यांनी हळूहळू नाटकाविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली. नाटक न बघताच ते अश्लील आहे, बीभत्स आहे, रंगभूमीच्या पावित्र्याचा भंग करणारं आहे अशी हाकाटी सुरू केली. नाटक बंद पाडण्यासाठी गुंडगिरी, राजकीय दबाव, प्रशासकीय दबाव, साहित्य-नाटय़ संमेलनाच्या पातळीवरून दबाव असे सगळे मार्ग हाताळले गेले. दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी नाटकावरील बंदीच्या विरोधात कोर्टात जाऊन केस लढवली, जिंकली, पण तरीही विरोध शमत नव्हता. पुण्यातल्या शिवसैनिकांनी विरोध केला म्हणून मुंबईतल्या शिवसैनिकांनीही विरोध केला. तो निपटून काढण्यासाठी प्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खास प्रयोग करून दाखवलं गेलं. त्यांची सेन्सॉरशिप दिग्दर्शकानं अप्रत्यक्षपणे स्वीकारली, या टीकेलाही सारंग यांना तोंड द्यावं लागलं. आयत्या वेळी परवानगी नाकारली म्हणून प्रयोग रद्द होणं, आयोजकांनी  पैसे बुडवणं, प्रशासकीय दबाव, रंगमंचावर येऊन राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी या सगळ्यातून तावूनसुलाखून ‘सखाराम’ बाहेर आला आणि एक महत्त्वाचं वेगळं नाटक म्हणून देशभर गाजलं.

‘सखाराम’ची नाटक म्हणून, आशय म्हणून जी वैशिष्टय़ं आहेत, त्यावर आजपर्यंत अनेकदा भरपूर चर्चा झाली आहे. ‘सखाराम’चं नाटक म्हणूनच त्याकडे बघितलं गेलं आहे. पण खरं तर हे नाटक आहे लक्ष्मीचं आणि चंपाचं नाटक. पुरुषप्रधान व्यवस्थेचा चेहरा दाखवत तेंडुलकरांनी हे स्त्रीवादी मांडणी करणारं नाटक लिहिलं आहे. ‘हा सखारामचा महाल आहे’ असं म्हणत सखाराम त्या घरातलं स्वत:चं प्रभुत्व सुरुवातीलाच ठसवत असला तरी एकीकडे चंपाच्या रूपानं तो पुरता पाघळला आहे आणि त्याला ती जुमानत नसली तरी तो तिच्यापुढे शारीर पातळीवर हतबल आहे आणि दुसरीकडे मुंगळ्या-कावळ्यांशी बोलणाऱ्या, त्यांच्याशी एकरूप होणाऱ्या, सखारामच्या मांडीवर मरण येऊ दे, असली भाषा बोलणाऱ्या लक्ष्मीपुढे तो मानसिक पातळीवर दुबळा आहे. शारीरिक आणि मानसिक पातळीवर या दोन्ही बायका त्याच्यावर अधिराज्य गाजवतात. तो रागाच्या भरात चंपाचा खून करतो आणि आपण हे काय करून बसलो म्हणून हतबल होतो तेव्हा एरवी साधी मवाळ वाटणारी, सतत पापपुण्य असली भाषा बोलणारी लक्ष्मीच त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेते आणि आपल्या हातून खून झालाय या जाणिवेने गर्भगळीत झालेल्या, सखारामच्या आयुष्याच्या नाडय़ा आता दुबळ्या मानल्या गेलेल्या, पण प्रत्यक्षात परिस्थिती आल्यावर निडर बनून तिला तोंड देणाऱ्या, परिस्थिती ताब्यात घेणाऱ्या लक्ष्मीच्या हातात आहेत, असं सूचित करत हे नाटक संपतं. ‘सखाराम’मधल्या या स्रीप्रधान, स्त्रीवादी पैलूंवर मात्र आजतागायत फारशी चर्चा झालेली नाही.

(‘सखाराम बाइंडर’च्या या पाच प्रयोगांसाठी राहुल रानडे, प्रसाद वालावलकर, संतोष पेडणेकर, कौस्तुभ दिवाण, सेवा मोरे, संजय पाटील, अंजली आंबेकर, अजय कसुर्डे, जयश्री जगताप, दिनेश पेडणेकर यांची मदत झाली.)

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य- लोकप्रभा