संजय लीला भन्साळींच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. ऐश्वर्या राय व सलमान खान यांची रोमँटिक केमिस्ट्री, त्यांची अधुरी प्रेमकहाणी आणि अजय देवगणचा दमदार अभिनय यांमुळे हा सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यातील प्रत्येक गाणे गाजले. या सिनेमाला २६ वर्ष पूर्ण झाली आहेत.
बॉलीवूड अभिनेत्री शीबा चड्ढा हिने ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये संजय लीला भन्साळी आणि अभिनेता सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला. सलमान खानबद्दल बोलताना शीबा म्हणाली की, एकदा तो सेटवर खूप रागावला होता आणि रागाच्या भरात सेटवरून निघून गेला होता. तिने सांगितले की, त्यादरम्यान एका माणसाला थोडी दुखापत झाली होती. शीबाने सलमान खान कशावर रागावला होता ते सांगितले.
सलमान खान का रागावला होता?
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका खास मुलाखतीत शीबाने सलमानला राग येतो हे उघड केले. एक प्रसंग सांगताना शीबाने सांगितले, “मला फक्त एकच घटना आठवते. असे काहीतरी घडले होते की, ट्रॅक लावला होता. सलमान कदाचित घसरून पडला असेल किंवा असंच काहीतरी असेल. मला आठवतं की, तो रागाच्या भरात सेटवरून निघून गेला होता. त्यानं रागाच्या भरात दार उघडलं आणि दाराच्या मागे एक म्हातारा एक लाईटमॅन किंवा कोणीतरी होतं आणि त्याला थोडी दुखापत झाली होती.”
संजय लीला भन्साळींबद्दल ती काय म्हणाली?
संजय लीला भन्साळींबद्दल बोलताना शीबा म्हणाली की, त्याला पाहून तिला वाटलं की तो एक उत्साही दिग्दर्शक आहे. शीबाला विचारण्यात आले की, संजयच्या इच्छेनुसार काही घडलं नाही, तर तो रागावतो असे म्हणतात? त्यावर शीबा म्हणाली की, तिनं असं काहीही पाहिलेलं नाही.
ती म्हणाली की, तिला वाटते की, नंतर संजय यांच्याबद्दल अशा अनेक कथा लोकप्रिय झाल्या; पण त्यावेळी असे काहीही नव्हते. शीबा म्हणाली की, मला ते कोणावरही रागावल्याचे आठवत नाही; पण ते त्यांचं काम खूप आवडीनं करतात. शीबा म्हणाली की, तिला संजय यांची कधीच भीती वाटली नाही.
‘हम दिल दे चुके सनम’ १९९९ साली रिलीज झाला. सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री आजही लोक विसरलेले नाहीत. रोमँटिक चित्रपटांमध्ये या सिनेमाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आज इतक्या वर्षांनंतरही त्यातील गाणी ऐकली जातात.