गलवान खोऱ्यात २०२० साली भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षाची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असून अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात बॉलीवूड अभिनेता सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी सलमान खानने तयारी सुरू केली असून जुलै महिन्यात लडाख येथे चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाबरोबरच सलमान पुन्हा एकदा त्याचा आवडता दिग्दर्शक कबीर खान याच्याबरोबरही नव्या चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि त्यामुळे भारत – चीन या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाची कथा चित्रपटरूपात पाहायला मिळणार आहे. शिव अरुर आणि राहुल सिंह यांच्या ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस ३’ या लोकप्रिय पुस्तकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या युद्धादरम्यान १६ बिहार रेजिमेंटचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल बी. संतोष यांची भूमिका सलमान खान करणार असल्याची चर्चा आहे. या भूमिकेसाठी सलमानने पूर्वतयारी सुरू केली आहे.

या भूमिकेसाठी सलमानला मोठ्या प्रमाणावर वजन घटवावे लागणार असून त्याने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या महिन्यात लडाखमध्ये सुरू होणार असून त्यानंतर सलग मुंबईतील स्टुडिओत चित्रीकरण करण्यात येणार आहे. सलमान व्यतिरिक्त अन्य कलाकारांची निवड सुरू आहे, मात्र अभिनेत्री चित्रांगदा सिंग यात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. सलमानच्या या चित्रपटाबरोबरच आणखी एका नव्या चित्रपटाच्या तयारीमुळे तो चर्चेत आला आहे.

सलमानला सुपरहिट यश मिळवून देणाऱ्या ‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खान याच्याबरोबर तो पुन्हा एकदा नव्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहे. हे दोघेही ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू करणार असल्याची चर्चा असली तरी त्याविषयी दोघांपैकी कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, या दोन चित्रपटांमुळे आणि नेटफ्लिक्सवरील ‘द कपिल शर्मा शो ३’च्या नव्या पर्वातील पहिल्याच भागात सलमानने केलेल्या वक्तव्यांमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘येरे येरे पैसा ४’मध्ये माझी भूमिका….

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या निर्मितीसंस्थेचे पाठबळ लाभलेल्या ‘येरे येरे पैसा ३’ या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह सलमान खानही खास उपस्थित राहिला होता. या चित्रपटाचा टीझर आणि त्याचे शीर्षकगीत दोन्ही कमाल आहेत, अशा शब्दांत सलमानने कौतुक केले. या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महेश मांजरेकर यांनी ‘येरे येरे पैसा २’मध्ये मला दमदार खलनायकाची भूमिका मिळणार असे सांगितले गेले होते, मी अजून वाट पाहतो आहे… असे सांगत मिश्कील टिप्पणी केली. त्या वेळी मांजरेकर यांची री ओढत ‘येरे येरे पैसा ४’मध्ये आपण दोघे काम करू, असे गमतीशीर उत्तर सलमानने दिले. अमेय विनोद खोपकर पिक्चर्सची निर्मिती असलेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा सलमान खानच्या उपस्थितीमुळे अधिकत वलयांकित झाला.