सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. ‘गजनी’ बनवणारे एआर मुरुगदास सलमानला एक नवीन ओळख देतील, असे मानले जात होते; पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. ‘सिकंदर’ची कथा, अभिनेत्याचा अभिनय व दिग्दर्शन हे सर्व फ्लॉप ठरले.

चित्रपटाला वाईट प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक एआर मुरुगदास यांनी त्यांचे मत मांडले आहे. दिग्दर्शकाने कबूल केले की, ते ‘गजनी’ बनवण्यात यशस्वी झाले. कारण- तो रिमेक होता. सलमान खानचा ‘सिकंदर’ ही एक मूळ कथा होती, जी ते चांगल्या प्रकारे सादर करू शकले नाहीत.

सुरुवातीला मुरुगदास म्हणाले होते की, चित्रपटाच्या खराब कामगिरीचे कारण भाषेतील अडथळा होते. अलीकडेच वेलाईपेचू व्हॉइसशी झालेल्या संभाषणात त्यांनी त्यामागील कारण सांगितले. दिग्दर्शक म्हणाले, “खरं तर मूळ कथा खूप भावनिक होती. ती कथा एका राजाबद्दल आहे, जो आपल्या पत्नीला योग्यरीत्या समजून घेऊ शकत नाही. आपण सर्व जण कधी कधी नातेसंबंधांच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा कोणी कायमचे निघून जाते तेव्हा आपल्याला त्यांची अनुपस्थिती जाणवते. चित्रपटात जेव्हा राजा आपली पत्नी गमावतो, तेव्हा तिचे अवयव तीन लोकांना दान केले जातात. त्यानंतर तो त्या लोकांद्वारे आपल्या पत्नीची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि एका संपूर्ण गावाशी जोडला जातो. ती कथा भावनिक होती; पण मी ती चांगल्या प्रकारे साकार करू शकलो नाही.”

ते पुढे म्हणाले, “मी ‘गजनी’ करू शकलो. कारण- तो रिमेक होता आणि माझ्याकडे पूर्ण प्रभुत्व होते. पण, ‘सिकंदर’ ही माझी मूळ पटकथा होती. प्रेक्षक माझ्या विचारांशी जुळू शकले नाहीत आणि हीच सर्वांत मोठी समस्या होती. मी हिंदी चित्रपट सोडत नाहीये; पण जेव्हा मला योग्य कम्फर्ट झोन मिळेल तेव्हा मी नक्कीच परत येईन.” प्रेक्षकांकडून ‘सिकंदर’ला वाईट प्रतिसाद मिळत असूनही चित्रपटाने सुमारे २०० कोटींची कमाई केली.

सलमान खानचा ‘सिकंदर’ सिनेमा ईदच्या निमित्ताने ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ‘सिकंदर’ सिनेमा चांगली कमाई करील, अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार सिनेमाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सिकंदर’ सिनेमात भाईजानबरोबर रश्मिका मंदाना, प्रतीक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.