Salman Khan Slams Donald Trump Bigg Boss 19 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या बिग बॉस १९ शो होस्ट करत (कार्यक्रमाचं सूत्रसंचालन/निवेदन) आहे. या कार्यक्रमाच्या रविवारच्या भागात सलमानने काही स्पर्धकांना खडे बोल सुनावले. सलमानने यावेळी स्पर्धकांमधील भांडणं व वादांवर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्यातलं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याने फरहाना भट्ट हिला सुनावलं. फरहानाच्या कार्यक्रमातील व्यवहारावर टिप्पणी करताना सलमानने केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा होत आहे. सलमानने फरहानाच्या खांद्यावरून थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधल्याची देखील चर्चा होत आहे.
सलमान खान फरहानाला म्हणाला, “तू शांतता कार्यकर्ता असल्याचा दावा करतेस. परंतु, तू या कार्यक्रमात शांतता राहावी यासाठी काही करताना दिसत नाहीस. उलट तू कार्यक्रमातील शांततेवरच गदा आणतेस. मला तुला सांगायचं आहे की शांतता कार्यकर्ते भांडणं सोडवतात, भांडत असलेल्या लोकांमध्ये मैत्री घडवून आणतात. जगभरात काय चाललंय तेच कळत नाही. जे लोक जगभरात सर्वात जास्त अशांतता, अस्थिरता निर्माण करत आहेत त्यांनाच शांततेचा पुरस्कार हवा आहे.”
सलमानचा एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न?
सलमानने हे वक्तव्य करत असताना कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, त्याने अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिमटा काढल्याचं बोललं जात आहे. काही नेटकऱ्यांनी सलमानच्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की सलमानने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
सलमानच्या वक्तव्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काय संबंध?
सलमानने शांतता पुरस्काराचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध जोडला जात आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे त्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत. सातत्याने त्यावरून वक्तव्ये करत आहेत. “मी जगभरात सहा युद्धं रोखली”, असा दावा करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ट्रम्प समर्थक नेते देखील ट्रम्प यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळावं अशी मागणी करत आहेत. भारताच्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान यामध्ये आघाडीवर आहे.
नोबेलबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी बऱ्याचदा दावा केला आहे की त्यांनी इस्रायल विरुद्ध ईराण, ऱ्वांडा विरुद्ध काँगो (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो), थायलंड विरुद्ध कंबोडिया, भारत विरुद्ध पाकिस्तान, इजिप्त विरुद्ध इथिओपिया, सर्बिया विरुद्ध कोसोव्हो या देशांमधील युद्धं रोखली आहेत. ते म्हणाले, “माझं काम शांततेच्या नोबेलपेक्षा मोठं आहे. परंतु, मला हा पुरस्कार दिला जाणार नाही. कारण त्यांना मी व माझी धोरणं आवडत नाहीत.” सलमानचं शांततेचा पुरस्कार असा उल्लेख करत केलेलं वक्तव्य हे ट्रम्प यांच्या याच मागणीशी संबंधित असल्याचा दावा समाजमाध्यमांवरून केला जात आहे.