बॉलिवूडचा दबंग खान सलमान लाखो तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. नुकताच त्याचा ‘दबंग ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता सलमानने ट्विटद्वारे त्याच्या आगमी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

सलमानने ट्विट करत २०२१मध्ये ईदच्या मुहूर्तावर नवा चित्रपट घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे नाव ‘कभी ईद कभी दिवाली’ असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार असून चित्रपटाची निर्मीती साजिद नाडियाडवाला करणार आहे. आता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

सलमानचा येत्या ईदाला ‘राधे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी सलमान आणि रणदीपने सुलतान चित्रपटात एकत्र काम केले आहे तर दिशा आणि जॅकी यांनी ‘भारत’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. सलमानने चित्रपट निर्माते सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करत चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचे सांगितले आहे.