बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. मात्र काल अनन्या एनसीबी कार्यालयात तीन तास उशिरा पोहोचली. यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी अनन्याला फटकारलं आहे. “तुला ११ वाजता बोलवलं होतं आणि तू आता येतेस,” अशा शब्दात समीर वानखेडेंनी अनन्याला सुनावले.
मुंबई-गोवा क्रूझवरील अमली पदार्थांच्या पार्टीप्रकरणी एनसीबीकडून कसून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. तर दुसरीकडे एनसीबीला अनन्या आणि सध्या तुरुंगात असलेला आर्यन खान या दोघांचे काही चॅट्स सापडले आहेत. त्यातून धक्कादायक खुलासे होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनन्या पांडेची ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. वडील चंकी पांडेंसोबत आलेल्या अनन्याची पहिल्या दिवशी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) २ तास चौकशीनंतर, काल (२२ ऑक्टोबर) एनसीबीने पुन्हा ४ तास चौकशी केली.
काल २२ ऑक्टोबरला एनसीबीने अनन्याला ११ वाजता एनसीबी ऑफिसमध्ये उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र ती एनसीबी कार्यालयात दुपारी २ वाजता पोहोचली. तिला त्या ठिकाणी पोहोचण्यात ३ तास उशीर झाला. यानंतर समीर वानखेडे तिच्यावर चांगलेच भडकले. यावेळी समीर वानखेडेंनी अनन्याला खडे बोल सुनावले.
समीर वानखेडेंनी अनन्याला उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यानंतर ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला ११ वाजता बोलवलं होते आणि तुम्ही आता येताय. अधिकारी तुमच्यासाठी बसलेले नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे एनसीबीचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेत बोलावले जाईल, त्याच वेळेतच हजर राहा,” असे समीर वानखेडेंनी सांगितले.
एनसीबीच्या हाती आर्यन आणि अनन्यामधील व्हॉट्सअॅप चॅट
अनन्या पांडेशी संबंधित ३ व्हॉट्सअॅप चॅट्स सर्वात महत्त्वाच्या ठरत आहे. 2018 ते 2019 च्या दरम्यान झालेल्या या चॅटमध्ये गांजाबाबत बोलणं झालंय. त्यामुळे एनसीबीने अनन्याचे दोन्ही फोन जप्त केलेत. एनसीबीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अनन्या गोंधळलेली पाहायला मिळाली. अनेक प्रश्नांची उत्तरं तर अनन्यानं व्यवस्थित आठवत नाही, असं म्हणत टाळले. एनसीबीने अनन्याला पुन्हा एकदा सोमवारी (२५ ऑक्टोबर) चौकशीसाठी बोलावलं आहे.