Sandra Thomas On Drugs Uses In Malayalam Industry : मॉलिवूड म्हणजे मल्याळम सिनेसृष्टीमधील चित्रपटांची जितकी चर्चा गेल्या काही काही वर्षात होत आहे, तितकीच या चित्रपटसृष्टीमधील काळी बाजूही समोर येताना दिसत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी विविध प्रसंगांमधून पडद्यामागच्या काही धक्कादायक गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेसृष्टीमधील कास्टिंग काऊचसारखी प्रकरणे समोर येत असताना आता ही इंडस्ट्री ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचेही समोर येत आहे.

मल्याळम सिनेसृष्टीमधील चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री सँड्रा थॉमस यांनी याबद्दल खुलासा केला आहे. सँड्रा थॉमस यांनी सांगितले की, मल्याळम सिनेसृष्टी ड्रग्जच्या गटारात इतकी बुडाली आहे की, यासाठी चित्रपटाच्या बजेटमधून चक्क ‘ड्रग्ज मनी’ म्हणजेच विशेष बजेट ठरवले जातात. २०२३ मध्ये, मॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या वाढत्या वापराचे गंभीर आरोप झाले होते, तेव्हा सँड्रा थॉमस यांनी यांविरुद्ध आवाज उठवला होता.

अशातच आता एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, मल्याळम चित्रपटांमध्ये ड्रग्जचा सर्रासपणे वापर करणं सुरू आहे. या दोन वर्षांत तसा फारसा काही बदल झालेला नाही. आता तर परिस्थिती अशी झाली आहे की, चित्रपटाच्या बजेटमधील काही पैसे ड्रग्ज खरेदी करण्यासाठी वापरले जात आहे. तसंच सँड्रा यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या असोसिएशनवर जोरदार टीका करत या संघटना काहीही करत नाहीत असं म्हटलं आहे.

याबद्दल ‘ऑनलाइन मनोरमा’शी बोलताना सँड्रा असं म्हणाल्या, “संबंधित संघटनांनी किमान पाच-दहा वर्षांपूर्वीच मॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या वापराविरुद्ध योग्य पावले उचलायला हवी होती. सेटवर काय चालले आहे हे सर्वांना माहिती आहे. पण कोणीही याच्या सुधारणेसाठी पाऊल उचललं नाही. कारण त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी या लोकांची गरज आहे.” यापुढे सँड्रा थॉमस यांनी निर्माते चित्रपटाच्या बजेटमधील पैसे काढून ड्रग्ज खरेदी करतात असा आरोपही केला आहे.

यापुढे त्या म्हणाल्या, “ड्रग्जसाठी एक विशेष बजेट निश्चित केले जात आहे. तसंच यासाठी सेटवर स्वतंत्र खोल्याही बनवल्या जात आहेत. असोसिएशनचे म्हणणे आहे की, एका किंवा दोन लोकांच्या कृतीसाठी संपूर्ण उद्योगाला दोषी ठरवता येणार नाही. मी काही दिवसांपूर्वी लिस्टिन (मॅजिक फ्रेम्सचे निर्माते) यांना असे विधान करताना ऐकले. लिस्टिनसारख्या लोकांना या समस्येची जाणीव नाही का? त्यांना माहित नाही का? की सेटवर ड्रग्ज खुलेआम उपलब्ध आहेत?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर सँड्रा थॉमस म्हणतात, “सत्य हे आहे की, अशा लोकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट, आता ते अशा पातळीवर पोहोचले आहेत, जिथे पुरुष असो वा महिला, प्रत्येकजण ड्रग्जचं सेवन करतो. चित्रपटाचे निर्माते कलाकारांविरुद्ध तक्रार करण्यास तयार नाहीत; कारण यामुळे त्यांचे चित्रपट थांबतील अशी त्यांना भीती आहे. सेटवर कोणी पकडले गेले तर शूटिंग थांबते. यामुळे कलाकारांची प्रतिष्ठाही खराब होते.”