छोट्या पडद्यावर ‘पवित्र रिश्ता’, तर रुपेरी पडद्यावर ‘काइ पो चे’ या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट आज (२४ जुलै) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमधील या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच सुशांतचा हा अखेरचा चित्रपट असल्यामुळे सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यातच सुशांतच्या अनेक जुन्या आठवणींना चाहते उजाळा देत असून पुन्हा एकदा त्याच्या स्वप्नांची यादी चर्चेत आली आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्याने उराशी अनेक स्वप्नं बाळगली होती. सुशांतने ५० स्वप्नांची यादी तयार केली होती आणि ते सारं त्याला करुन पाहायचं होतं. . मात्र त्याची स्वप्न अर्ध्यावरच राहिली. परंतु सुशांतची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण पुढे सरसावली आहे. सुशांतची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला आहे.
सुशांतच्या निधनानंतर चाहत्यांसह कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मृत्युनंतर त्याच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यातीलच एक गोष्ट म्हणजे त्याची स्वप्नांची यादी. २०१९मध्ये सुशांतने त्याच्या स्वप्नांची एक यादी सोशल मीडियावर शेअर केली होती. यामधील काही स्वप्न त्याने पूर्ण केले होते. मात्र त्यातील बरीच स्वप्ने अपूर्ण राहिली आहेत. ही स्वप्न त्याची मैत्रीण पूर्ण करणार आहे. तिने सोशल मीडियावर सुशांतसाठी एक पोस्ट शेअर करत तुझी स्वप्न मी पूर्ण करेन असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टमुळे सध्या एकच चर्चा सुरु झाली आहे.
सुशांतच्या आगामी ‘दिल बेचारा’ या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री संजना सांघी हिने सुशांतची स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने सुशांतसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
“वेळेबरोबर जखमाही भरुन निघतात,असं ज्याने म्हटलं आहे ते चूक आहे. उलट त्या जखमा प्रत्येकवेळी पुन्हा उघड्या पडतात. आयुष्यात कायम लक्षात राहतील असे प्रत्येक क्षण रक्ताप्रमाणे पुन्हा वाहू लागतात. आता पुन्हा एकत्र खळखळून हसता येणार नाही, काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पण हे दु:ख पचवण्यासाठी आपला चित्रपट काय तो उपाय आहे. निदान तेच काय या क्षणी सगळ्यांसाठी भेटवस्तू आहे”, असं संजना म्हणाली.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पुढे ती म्हणते, “मी तुला वचन देते, तुझी अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. जी तुझी इच्छा होती, ती मी पूर्ण करेन. मात्र तू वचन दिलं होतंस की ही स्वप्न आपण एकत्र पूर्ण करु. परंतु आता तुझ्याशिवाय मला ही स्वप्न पूर्ण करायची आहेत”.
सुशांतची ड्रीमलिस्ट
विमान चालविण्याचं प्रशिक्षण, आयर्नमॅन ट्रायथलॉनचं ( स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग) प्रशिक्षण घेणे, जंगलात एक आठवडा रहाणं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं, जवळपास १० नृत्यप्रकार शिकणं, शेती करणं शिकणं, आवडती ५० गाणी गिटारवर वाजवायची होती, एका लॅम्बोर्गिनीचं मालक होणं, स्वामी विवेकानंदांवर आधारित डॉक्युमेंट्री तयार करणं, क्रिकेट खेळणं, मार्स कोड( टेलिकम्युनिकेशन लॅग्वेंज) शिकणं,अंतराळाविषयीची माहिती जाणून घेण्यास उत्सुक विद्यार्थ्यांना शिकवणं, चार टाळ्या वाजून करण्याची पुशअप्स स्टाइल, एक हजार वृक्षारोपण करणं, दिल्लीतील कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक संध्याकाळ व्यतीत करणं, कैलाश पर्वतावर बसून ध्यानधारणा करणं, एक पुस्तक लिहिणं, सहा महिन्यात सिक्स पॅक अॅब्ज करणं,अशी अनेक स्वप्न सुशांतला पूर्ण करायची होती.
दरम्यान, सुशांतच्या झालेल्या अचानक निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सुशांत कमी कालावधीत लोकप्रिय झाला होता. त्यामुळेच त्याने कलाविश्वात स्वतंत्र स्थानही निर्माण केलं होतं. त्याने जवळपास १२ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.