शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता आणखी एका नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची संजय राऊत निर्मिती करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे.

आणखी वाचा – ‘ठाकरे २’ चित्रपटाबाबत संजय राऊत यांचा खुलासा, म्हणाले, “जर एकनाथ शिंदेंवर चित्रपट येऊ शकतो तर…”

संजय राऊत यांचा नवा चित्रपट
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या ‘मटा कॅफे’ कार्यक्रमात संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “ठाकरे चित्रपटाचा दुसरा भाग मला काढायचा होता. त्याहीपेक्षा जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं काम मी जवळजवळ संपवत आणलं होतं. पण मधल्या काळात आमच्यावर काही संकटं आली.”

“जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर मी चित्रपट काढणार. या चित्रपटाचं बाकी सगळं काम झालं आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. कारण नवीन पिढीला बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस हे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं हे समजायला हवं. सलमान खान, शाहरुख खान आहेतच. पण आमच्या पिढीचे हिरो हे नेते होते.”

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

संजय राऊत यांनी एकंदरीतच त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगळुरु येथे झाला. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले. जॉर्ज फर्नाडिस १९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला. या आंदोलनाने जॉर्ज फर्नांडिस यांना लढवय्या कामगार नेता अशी ओळख मिळवून दिली.