Sankarshan Karhade : मराठी सिनेसृष्टीचा सर्वगुण संपन्न अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेला ओळखले जाते. संकर्षण टीव्ही मालिका, चित्रपट, नाटक, लेखन अशा सर्वच क्षेत्रातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. याशिवाय दिग्दर्शन, अभिनय व कवितांमधूनही तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. संकर्षणच्या अनेक कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या कविता व अभिनयामधून चर्चेत राहणारा संकर्षण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो.
अशातच संकर्षणने सोशल मीडियाद्वारे त्याच्या आयुष्यातील दोन छान गोष्टींची माहिती शेअर केली आहे. अभिनेत्याला यंदाचा ‘द. मा. मिरासदार’ हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्याच्या ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचे ३५ दिवसांत २५ प्रयोग पूर्ण झाले आहेत. याबद्दल त्याने आनंद व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे आणि याबद्दल त्याने चाहत्यांना धन्यवादही म्हटलं आहे. या पोस्टमध्ये संकर्षणने असं म्हटलं आहे की, “काल (रविवार, २७ एप्रिल) दोन छान छान गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे मोहन जोशी सरांच्या हस्ते मला यंदाचा द. मा. मिरासदार हा पुरस्कार मिळाला.”
पुढे तो म्हणाला की, “या पुरस्काराबद्दल मिरासदार व मंकणी परिवाराचे खूप आभार. दुसरी छान गोष्ट म्हणजे ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचे ३५ दिवसांत २५ प्रयोग पूर्ण झाले. हे सगळं घरच्यांची साथ, माझ्या माणसांचं माझ्यावरचं प्रेम, सहकलाकारंची जोड आणि रसिक प्रेक्षकांच्या सहकार्यामुळे व प्रेमामुळे झालं. दोन्ही गोष्टींचा आनंद निरनिराळ्या कारणासाठी खास आहे. मिरासदारांच्या कथा मी वाचत आलो आहे. काल कळलं की, त्यांचं पंढरपूरशी विशेष नातं होतं आणि आहे. योगायोगाने ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकातही पांडूरंगाची भक्ती करणारं कुटुंब आहे.”
यानंतर त्याने असं म्हटलं की, “मला असं वाटलं की, पांडुरंगाच्या गावातून पांडुरंगाचाच निरोप घेऊन पांडूरंगाभोवती रचलेल्या नाटकाचे २५ प्रयोग झाल्याबद्दल पांडुरंगानेच प्रेमाची प्रचिती या पुरस्कारातून मला दिली. एकीकडे ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे. सगळ्यांना नाटक, नाटकाचं लिखाण, प्रत्येक कलाकाराचं काम खूप आवडत आहे. छान वाटलं बघा. असेच पाठीशी रहा. शुभेच्छा, आशीर्वाद, प्रेम आणि प्रतिसाद यातलं जे काही शक्यं आहे ते मला देत रहा. मी कायम माझं काम प्रामाणिकपणे, खरं आणि उत्तम करायचा प्रयत्न करीन. राम कृष्ण हरी.”
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच संकर्षणचं ‘कुटुंब किर्रतन’ हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या नाटकात अभिनेत्री स्वत: संकर्षण, अमोल कुलकर्णी, अभिनेत्री तन्वी मुंडले आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका आहेत. रंगभूमीवर या नाटकाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे या नाटकाने ३५ दिवसांत २५ प्रयोग पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त संकर्षणने शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सद्वारे त्याचं कौतुक केलं आहे.