Sarang Sathaye Got Married : सारंग साठ्ये हा लोकप्रिय स्टॅंडअप कॉमेडियन, दिग्दर्शक व अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता लक्ष्मण उतेकर यांच्या ‘छावा’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आलेला. परंतु, आता तो चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे आणि ते म्हणजे सारंग व त्याची गर्लफ्रेंड पॉला यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.
सारंगने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सारंगने पॉलाबरोबरचे काही गोड फोटो शेअर करीत या पोस्टला मोठी कॅप्शन देत, त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी अभिनेत्याने अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पॉलाबरोबर २८ सप्टेंबर रोजी रविवारी लग्न केल्याचं म्हटलं आहे.
सारंग साठ्ये झाला व्यक्त
सारंगने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत म्हटलं, “हो, आम्ही लग्न केलं! तुम्हा सर्वांना माहीत आहे की, आमच्यासाठी लग्न कधीच प्राधान्य नव्हतं. पण, आम्हाला वेगळं ठेवू शकणारी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे एक कागदाचा तुकडा. गेलं वर्षं कठीण होतं. जगभर संघर्षाचं वातावरण होतं. द्वेष इतका वाढला होता की, पहिल्यांदाच आम्हाला भीती वाटली की, आपण एकमेकांपासून दूर जाऊ. पण प्रेम नेहमीच द्वेषावर विजय मिळवतं. आमचं प्रेम आणि मैत्री अशीच अबाधित राहावी म्हणून आम्ही २८/०९/२०२५ रोजी लग्न केलं. लग्न खूप खासगी होतं. आमची जवळची माणसं आणि काही मोजके मित्र, आमच्या आवडत्या झाडाखाली (Deep Cove) मध्ये एकत्र जमले. ही एक चांगली संधी होती दोन्ही कुटुंबांना एकत्र आणण्याची.”
सारंगने या पोस्टमधून पुढे, “आम्ही एकमेकांना गोष्टी सांगितल्या, गाणी गायल आणि एकमेकांना वचन दिलं की, आपण आज जसे एकमेकांच्या प्रेमात आहोत आणि जिवलग मित्र आहोत, तसेच पुढेही राहू! हीच आमची छोटीशी गोष्ट. प्रेम नेहमीच जिंकेल!”, असं त्यानं म्हटलं आहे. सारंग व पॉला एकमेकांबरोबर १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्याबद्दल त्यांच्या अकाउंटवरील एका पोस्टमध्ये लिहिलेलं पाहायला मिळतं.
सारंगच्या या पोस्टखाली मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करीत या नवविवाहित जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रिया बापटने अभिनंदन करीत तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. दोघांनाही खूप प्रेम, असं म्हटलं आहे. तिच्याबरोबर सोनाली कुलकर्णी, हेमल इंगळे, अमृता खानवीलकर, क्षिती जोग, अभिजीत खांडकेकर, नेहा पेंडसे, सौरभ चौघुले या कलाकरांनी कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सारंग व पॉला यांचं ‘भाडिपा’ या नावानं स्वत:चं यूट्यूब चॅनेल आहे. काही वर्षांपूर्वी दोघांनी त्यांच्या जवळच्या मैत्रिणीबरोबर ते सुरू केलेलं. आज त्याबरोबर त्यांची इतरही यूट्यूब चॅनेल्स आहेत, ज्यामार्फत ते विविध विषयावर आधारिक कन्टेंट बनवत असतात. त्यामुळे दोघे नवरा-बायको असण्याबरोबर एकमेकांचे बिझनेस पार्टनरही आहेत.