दीनानाथ परब 

सध्याचा जमाना वेब सीरिजचा आहे. तीन तासांत जी गोष्ट मोठया पडद्यावर मांडणं शक्य नाही, असे विषय वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. लॉकडाऊनच्या या काळात आश्रम, एक थी बेगम, स्पेशल ओपीएस, माफिया, आर्या अशा एकाहूनएक सरस कलाकृती OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता आल्या. आता सोनी लिव या अ‍ॅपवर प्रदर्शित झालेली ‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज सुद्धा याच धाटणीतील आहे.

९० च्या दशकातील स्टॉकब्रोकर हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारीत असलेली ही वेब सीरिज दिग्दर्शक हंसल मेहता यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडली आहे. हर्षद मेहता एक व्यक्ती म्हणून कसा होता? त्याची विचार करण्याची काय पद्धत होती, त्याचं कौटुंबिक आयुष्य, समाजाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन अशा सगळयाच बारीक-सारीक बाबी हंसल मेहता यांनी उत्कृष्टपणे मांडल्या आहेत. एखादा चांगला सिनेमा जसा सुरुवातीच्या काही मिनिटांत मनाची पकड घेतो, तशीच ही वेब सीरिज आहे.

सामान्य माणसाला असमान्य परिस्थितीवर मात करुन, यशस्वी झालेला नायक नेहमी आवडतो. परंपरागत मध्यमवर्गीय चौकट मोडून यशोशिखराकडे झेप घेणाऱ्या नायकांचं समाजाला नेहमीच कौतुक असतं. ‘स्कॅम १९९२’ ही वेब सीरिज अशा सर्व प्रेक्षकांचा विचार करुन बनवण्यात आली आहे. शेअर बाजाराबरोबरच या वेब सीरिजमध्ये तो सर्व मसाला आहे, ज्यामुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते.

वर्तमानत्रपाच्या कार्यालयातल्या सीनपासून या वेब सीरिजची सुरुवात होते. श्रेया धन्वंतरीला भेटायला SBI मधून एक माणूस येतो. बँकेत ५०० कोटीचा घोटाळा झाल्याची तिला माहिती देतो. भेटायला आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं, तो प्रचंड घाईगडबडीत असतो. श्रेयाला संपूर्ण विषय समजावून सांगण्याआधीच तो तिथून निघून जातो. तिथून श्रेया या घोटाळयाचा शोध सुरु करते. तिने पत्रकार सुचेता दलाल यांची भूमिका साकारली आहे. १९९२ साली हा घोटाळा उघड करण्यात सुचेता दलाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

९० च्या दशकात देश लायसन्स राज संपवून आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर असताना हा प्रचंड मोठा घोटाळा उजेडात आला होता. काही हजार कोटींच्या या घोटाळयाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. सामान्य कुटुंबातून आलेल्या हर्षद मेहताने इतका मोठा घोटाळा कसा केला? हाच प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. प्रतिक गांधी या कलाकाराने हर्षद मेहताची मुख्य भूमिका साकारली आहे. चेहरेपट्टी आणि शारीरिक आकारमानावरुन तुम्हाला प्रतिक हर्षद मेहता वाटणार नाही. पण त्याने ज्या पद्धतीने ही भूमिका वठवली आहे, त्याला तोड नाही.

कांदिवलीच्या चाळीतून फ्लॅटमध्ये जाण्याची श्रीमंतीची स्वप्ने पाहणारा हर्षद मेहता त्याने उत्तमरितीने वठवला आहे. यशस्वी होण्याचा आत्मविश्वास, संकट कितीही मोठ असलं, तरी त्यासमोर डगमगून न जाता मार्ग काढण्याचा स्वभाव, कौटुंबिक मूल्ये जपणारा मुलगा आणि शेवटी व्यवस्थेसमोर खचलेला हर्षद त्याने रंगवला आहे. हर्षद मेहताच्या जीवनातील कुठलाही पैलू सुटणार नाही आणि तो प्रभावी पद्धतीने कसा मांडला जाईल, याची पुरेपूर खबरदारी दिग्दर्शकाने घेतली आहे. शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन म्हटला जाणारा हर्षद मेहता सुद्धा शेअर्सच्या या गणितात चुकला होता. मोठया नुकसानीमुळे त्याच्यासाठी सुद्धा शेअर मार्केटचे दरवाजे बंद झाले होते. ते दिवस हर्षद मेहतासाठी कसे होते? हे सुद्धा वेब सीरिजमध्ये पाहता येईल.

हर्षद मेहताने बनावट कंपन्यांचे शेअर्सचे भाव कसे वाढवले ? आपली संपत्ती वाढवण्यासाठी बँकांच्या पैशांचा त्याने कसा वापर केला? पैशांच्या या फिरवा फिरवीच्या रॅकेटमध्ये तो कसा अडकत गेला? बरं हे सर्व त्यावेळी एकटा हर्षद मेहताच करत होता का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. त्याच्या स्पर्धकांनी हर्षदला अडकवण्यासाठी काय खेळी केली? त्याचे बाहेर पडण्याचे मार्ग कसे बंद केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्कॅम १९९२ मध्ये मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कलाकारांची अचूक निवड आणि ९० च्या दशकातील तो काळ जसाच्या तसा डोळयासमोर उभा करणं हे ‘स्कॅम १९९२’ चे मोठे यश आहे. ‘रिस्क है तो इश्क है, हर्षद का राज मा मार्केट मजा मा’ असे डायलॉग विशेष लक्षात राहतात. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी निवडलेल्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. पत्रकार सुचेता दलालची भूमिका साकारणारी श्रेया धन्वंतरी विशेष लक्षात राहते. हर्षदचा भाऊ अश्विन मेहताची भूमिका साकरणारा हेमंत खेर, हर्षदचा मित्र बनलेला चिराग व्होरा यांच्यासह सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. कांदिवलीच्या साध्या चाळीतून वरळीच्या आलिशान पेंटहाऊसपर्यंतचा हर्षदचा प्रवास, त्याला आलिशान गाड्यांची असलेली आवड हे सर्व पैलू दिग्दर्शकाने उत्तमरित्या टिपले आहेत. पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशिष बासू यांच्या ‘The Scam: Who Won, Who Lost, Who Got Away’ या पुस्तकावर ही वेब सीरिज आधारीत आहे. दिग्दर्शकाने हर्षद मेहताबद्दल कुठेही सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण ही वेब सीरिज पाहिल्यानंतर कोण बरोबर कोण चूक हे प्रेक्षकांना ठरवायचं आहे.