भारतीय चित्रपटसृष्टीत नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’ आणि ‘स्क्रीन’ यांनी ‘स्क्रीन अकादमी’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. स्क्रीन अकादमीद्वारे नव्या फिल्ममेकर्सना शिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात मदत करण्यात येईल.
या अकादमीत ‘ऑस्कर’ आणि ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’चे विजेते गुनीत मोंगा, पायल कपाडिया, रेसुल पुकुट्टी आणि प्रसिद्ध पटकथा लेखक अंजुम राजाबली यांच्यासह अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन लाभेल. ही अकादमी देशातील नामांकित फिल्म स्कूल्सबरोबर काम करत विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देणार आहे
लोढा फाउंडेशनचा पाठिंबा
लोढा फाउंडेशनचे सहसंस्थापक अभिषेक लोढा यांच्या मदतीने ही अकादमी स्थापन झाली आहे. दरवर्षी ही अकादमी देशातील प्रमुख फिल्म स्कूल्समधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर फेलोशिप (शिष्यवृत्ती) देणार आहे. विशेषतः जे विद्यार्थी उत्तम कथाकथन करू शकतात. पण आर्थिक अडचणीमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना ही फेलोशिप खूप उपयोगी ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
या उपक्रमाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई आणि चित्रपटसृष्टी यांचं अतूट नातं आहे. इंडियन एक्सप्रेस ग्रुपकडून स्क्रीन अकादमीसारख्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. ही अकादमी चित्रपट क्षेत्रात नव्या प्रतिभेला संधी देईल, याचा नक्कीच मोठा फायदा होईल.”
अनंत गोयंका यांची प्रतिक्रिया
‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’चे कार्यकारी संचालक अनंत गोयंका म्हणाले, “स्क्रीन अकादमी ही कला व मनोरंजन क्षेत्रातील गुणवत्ता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही आता अशी एक व्यवस्था तयार करत आहोत, जिथे नव्या प्रतिभावान लोकांना आर्थिक मदत आणि योग्य व्यासपीठ मिळेल.”
अभिषेक लोढा यांची प्रतिक्रिया
तर याबद्दल अभिषेक लोढा म्हणाले, “भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चित्रपट आणि कला हा आपल्या देशाचा मोठा भाग आहे. त्यामुळे या क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी स्क्रीन अकादमी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.”
फेलोशिप २०२५ साठी योजना
स्क्रीन अकादमी फेलोशिप २०२५ अंतर्गत, भारतातील तीन प्रमुख संस्थांमधील निवडक विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह पदव्युत्तर शिक्षणाची संधी दिली जाईल. त्या संस्था खालीलप्रमाणे आहेत.
१. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे</p>
२. सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), कोलकाता
३. व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई
मार्गदर्शन आणि मास्टरक्लासेस
फेलोशिप मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर भारतातील आघाडीच्या स्टुडिओज व नामांकित चित्रपट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, मास्टरक्लासेस आणि इंटर्नशिपसुद्धा मिळतील.
प्रमुख संस्थांमधून आलेल्या प्रतिक्रिया:
एफटीआयआयचे संचालक धीरज सिंह म्हणाले, “स्क्रीन हे नाव चित्रपट पत्रकारितेत अत्यंत प्रतिष्ठित आहे. आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही फेलोशिप खूप फायदेशीर ठरेल.”
SRFTI चे समीरन दत्ता म्हणाले, “आपल्या देशात विविध ठिकाणांहून उत्तम प्रतिभा येते, पण अनेकांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण घेणं कठीण जातं. ही फेलोशिप त्यांच्यासाठी फार महत्त्वाची ठरेल.”
व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षा मेघना घई पुरी म्हणाल्या, “गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आयुष्य बदलू शकतं. स्क्रीन अकादमीसोबतची ही भागीदारी आर्थिक अडचणींमुळे स्वप्ने मोडू नयेत यासाठी आहे.”
विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया
फेलोशिपसाठी निवड प्रक्रिया ज्येष्ठ पटकथालेखक आणि शिक्षक अंजुम राजाबली यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेल करण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल ते म्हणाले, “या उपक्रमामुळे नव्या पिढीला शिक्षण घेण्यासाठी संधी मिळे. यामुळे चित्रपट, टीव्ही आणि ओटीटी क्षेत्राला नव्या टॅलेंटचा फायदा होईल.”
स्क्रीन अकादमीचे मान्यवर सदस्य
गुनीत मोंगा – ऑस्कर विजेती निर्माता
पायल कपाडिया – कान्स ग्रँड प्रिक्स विजेती व गोल्डन ग्लोब नामांकित
रेसुल पुकुट्टी – ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर
रॉनी स्क्रूवाला – RSVP Films आणि UpGrad चे संस्थापक
सुभाष घई – प्रसिद्ध दिग्दर्शक आणि व्हिसलिंग वुड्सचे संस्थापक
‘स्क्रीन’बद्दल थोडक्यात
‘स्क्रीन’ हे १९५१ मध्ये स्थापन झालेले भारताचे पहिले चित्रपटविषयक वृत्तपत्र आहे. गेल्या ८० वर्षांहून अधिक काळ ‘स्क्रीन’ने भारतीय सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्रातील विश्वासार्ह बातम्यांचे वार्तांकन केलं आहे. ‘स्क्रीन’ हे हिंदी, इंग्रजी, मराठी आणि तमिळ या चार भाषांत मनोरंजनविषयक बातम्या देणारं व्यासपीठ आहे.