रेश्मा राईकवार

करोनाची सुरुवात होण्याआधी २०१९ च्या सप्टेंबरमध्ये राज शांडिल्य दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल’ प्रदर्शित झाला होता. मथुरासारख्या शहरात नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणाला अशी काही कामाची संधी मिळते, ज्याची कल्पनाही त्याने केलेली नसते. स्त्रीचा आवाज काढून पुरुषांचे मनोरंजन करणारी करमची पूजा शहरात प्रचंड लोकप्रिय होते. एक पुरुष असून स्त्री म्हणून पुरुषांशी फोनवर मैत्री करत त्यांचं मनोरंजन करताना स्त्रीला काय काय दिव्यातून जावं लागतं ते या सगळय़ातला फोलपणा, वरवरच्या दिखाव्याला भुलणारी मंडळी अशा कितीतरी गोष्टींवर बोट ठेवणाऱ्या या चित्रपटाला अनपेक्षितपणे कमालीचे यश मिळाले. या चित्रपटावरून प्रेरित असलेला त्याचा सिक्वेल ‘ड्रीम गर्ल २’ नावाने प्रदर्शित झाला आहे. पहिल्या चित्रपटात अर्थपूर्ण मनोरंजन होतं, तर दुसऱ्या भागाचा घाट हा निव्वळ मनोरंजनाचा उद्देश ठेवून घातला आहे.

yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

मथुरेत अजूनही पिढीजात मोडकळीस आलेल्या हवेलीत राहणारे करम (आयुषमान खुराणा) आणि त्याचे वडील जगजीत (अन्नू कपूर) दोघेही कर्जात बुडाले आहेत. बारावी पास असलेल्या करमला नोकरी मिळत नाही आहे. केवळ उत्तम आवाज आणि कमर लचकवत नृत्य करण्याचे कौशल्य या एवढय़ा जोरावर दोघेही माताराणीचा जागर कार्यक्रम करत पैसे कमावतात. करमचं पेशाने वकील असलेल्या परीवर प्रेम आहे, मात्र परीशी लग्न करायचं असेल तर सहा महिन्यात बँकेच्या खात्यात २५ ते ३० लाख रुपये रक्कम आणि दरमहा पैसे मिळवून देईल अशी नोकरी मिळवली पाहिजे, अशी अट परीचे वडील घालतात. इथून पुढे करमच्या प्रेमाची परीक्षा सुरू होते. या परीक्षेत उतरण्यासाठी स्त्री पात्र साकारण्याचं नाटकातलं कौशल्य आजमावत पुन्हा पूजा व्हायची पाळी करमवर येते. इथे डान्सबारपासून ते एका मुस्लीम कुटुंबाची सून होण्यापर्यंत अनेक सायास करमला करावे लागतात. बाकी एका खोटय़ातून उभा राहिलेला दुसरा, मग तिसरा असं निस्तरत झालेला घोटाळय़ांचा विनोदी गुंता हा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक व्यक्तिरेखा, त्या साकारणारे उत्तम कलाकार अशी एक मोठी फौज चित्रपटात आहे. त्यामुळे विनोदी चित्रपट म्हणून मनोरंजन करण्यात दिग्दर्शक राज शांडिल्य यांना यश आले आहे.

राज शांडिल्य यांनीच पहिल्या चित्रपटाच्या कथाकल्पनेचा विस्तार केला होता आणि दिग्दर्शनही केले होते. सिक्वेलसाठीही या दोन्ही बाजूंची धुरा त्यांनीच सांभाळली आहे. त्यामुळे पहिल्या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा करम, त्याचे वडील आणि मित्र स्मायली हा सगळा तामझाम त्यांच्या मूळ कंगोऱ्यांसह दुसऱ्या भागातही पाहायला मिळतो. मात्र इथे अनेक व्यक्तिरेखा आहेत. स्मायलीची प्रेयसी आहे, त्याचीही प्रेमकथा तडीस नेण्याची जबाबदारी पूजा रूपी करमवर येते. स्मायलीची प्रेयसी सकीना आणि तिचं चिवित्र व्यक्तिरेखांनी भरलेलं खानदान, पूजाचे चाहते अशा सगळय़ा व्यक्तिरेखा एकटय़ा पूजाच्या मागे फिरत फिरत एकात एक अडकत जातात किंबहुना पूजाला अधिक अडकवत जातात. या गुंत्यातून प्रामाणिकपणे सांगून सुटण्याचा प्रयत्नही करम आणि स्मायलीच्या अंगलट येतो. त्यामुळे विनोदासाठी केलेली एकूणच कथेची मांडणी आणि त्यानुसार असलेली अनेक पात्रांची रचना यातून अपेक्षित प्रासंगिक विनोदांची एक साखळी चित्रपटात लेखक – दिग्दर्शकद्वयीने निर्माण केली आहे. या चित्रपटाचे कथालेखन राज शांडिल्य यांनी नरेश कथोरिया यांच्याबरोबर मिळून केले आहे. इथे पात्रांना धर्माच्या अडचणी नाहीत, दोन्हीकडची मंडळी आंतर धर्मीय विवाहाच्या बाबतीत उदार आहेत, मात्र कुठेतरी परंपरागत विचार नव्या पद्धतीच्या लैंगिक बदलांचा सहजस्वीकार करताना दिसत नाहीत. तपशिलात सांगितलं तर चित्रपटाची मजा जाईल. तो एक विचार सोडला तर बाकी सगळे सुंदर स्त्रीच्या मागे लागणारे पुरुष, नाही म्हणायला बदल म्हणून तरुण पुरुषच प्रियकर हवा म्हणून आग्रह धरणारी आत्या चित्रपटात आहे. पण हा सगळा विनोदाचा मामला आहे. प्रेम मिळवण्यासाठी नायक या सगळय़ाला सामोरं जातो, त्याला आलेल्या अनुभवातून तो काहीएक बडबडही करतो मात्र हे सगळं सुधारण्याचा वगैरे प्रयत्न करण्याची जबाबदारी त्याच्यावर लेखक – दिग्दर्शकाने टाकलेली नाही.

केवळ मनोरंजन इतका माफक उद्देश ठेवून त्याबरहुकूम मांडणी केलेल्या या चित्रपटाचा खरा आधार हा अभिनेता आयुषमान खुराणा आहे. पहिल्या चित्रपटात केवळ स्त्रीचा आवाज होता. इथे स्त्री पात्र रंगवताना त्यापद्धतीने अक्षरश: बारीक कंबर आणि लटके-झटके, मुलींच्या चेहऱ्यावरचे हावभाव अशा बारीकसारीक गोष्टींसाठी आयुषमानने घेतलेली मेहनत पडद्यावर जाणवते. एरव्ही पुरुषांनी रंगवलेली स्त्री पात्रं विनोदाचाच विषय केला जातो, पण ती अनेकदा ओंगळवाणी वाटतात. इथे आयुषमानने स्त्री भूमिकेतून केलेली नृत्येही कमाल झाली आहेत. कुठेही किळसवाणं वाटणार नाही इतक्या सुंदर आणि अचूक पद्धतीने आयुषमानने पूजाची व्यक्तिरेखा सांभाळली आहे. इथे करमपेक्षा पूजा पडद्यावर अधिक काळ दिसते. आयुषमानने ज्या सुंदर पद्धतीने ही भूमिका साकारली आहे ती तितक्याच कमालीने आणि कुठेही तोल न जाऊ देता दिग्दर्शकाने पडद्यावर दाखवली आहे. जोडीला अन्नू कपूर, परेश रावल, असरानी, राजपाल यादव ही विनोदातली हुकमी मंडळी आहेत. मनज्योत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी दोघांनीही त्यांच्या भूमिका उत्तम निभावल्या आहेत. नुसरत भरुचाच्या जागी या चित्रपटात नायिका म्हणून अनन्या पांडेची वर्णी लागली आहे. तिला खूप काही करण्यासारखे नसले तरी तिचा पडद्यावरचा वावर सहज आणि चांगला वाटतो. सगळीच उडती गाणी आहेत. एकंदरीतच हसण्या-हसवण्याचा मामला म्हणून ही ड्रीम गर्ल बरी वाटते.

ड्रीम गर्ल २

दिग्दर्शक – राज शांडिल्य

कलाकार – आयुषमान खुराणा, अनन्या पांडे, अन्नू कपूर, परेश रावल, असरानी, राजपाल यादव, सीमा पहावा, विजय वर्मा, मनज्योत सिंग, अभिषेक बॅनर्जी, अनुषा मिश्रा, रंजन राज.