Shah Rukh Khan Daily Fitness and Diet Routine : प्रत्येक सेलिब्रिटीचे फिटनेस गोल वेगवेगळे असतात. अभिनेता शाहरुख खानदेखील स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक उपाय करतो.
बहुतेक लोक त्याच्या जीवनशैलीचे अनुसरण करून, स्वतःला निरोगी ठेवू इच्छितात. शाहरुख खान कधी झोपतो, तो काय खातो आणि वयाची ५० वर्षे ओलांडल्यानंतरही तो इतका तंदुरुस्त कसा आहे याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
शाहरुख त्याच्या दिवसातले २४ तास कसे वापरतो हे सर्वांनी पाहण्यासारखे आहे. त्याशिवाय शाहरुख फिटनेस, जेवण आणि स्वतःसाठीचा वेळ कसा राखून ठेवतो. याबद्दलदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सहसा डॉक्टर आणि लोक म्हणतात की, चांगल्या आरोग्यासाठी ७-८ तास झोपणे खूप महत्त्वाचे आहे. पण, शाहरुख खान या बाबतीत पूर्णपणे वेगळा आहे. तुम्हाला हे जाणून खूप आश्चर्य वाटेल की, तो दिवसातून फक्त तीन ते चार तास झोपतो. तो इतका कमी झोपल्यानंतरही नेहमीच इतका चपळ दिसतो. कमी झोपूनही त्याची ऊर्जा कधीही कमी होत नाही.
एका मुलाखतीत त्याने त्याच्या झोपेबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, “मी सकाळी ५ वाजता झोपायला जातो. जग जागे असताना मी झोपतो आणि जर माझे शूटिंग असेल, तर मी ९ किंवा १० वाजता उठतो. पण, जर मी रात्री २ वाजता घरी आलो, तर प्रथम मी आंघोळ करतो. मग व्यायाम करतो आणि नंतर झोपायला जातो.”
दिवसातून फक्त दोनदाच जेवण करतो
शाहरुख खानचे तंदुरुस्त शरीर आणि त्याचा नेहमीच तरुण दिसणारा चेहरा पाहून असे वाटते की, तो त्याच्या खाण्यापिण्याबद्दल खूप काळजी घेत असावा. त्याची खाण्या-पिण्याची दिनचर्या आपल्याला वाटते तितकी कठीण नाही. शाहरुख खान दुपारी आणि रात्री, असे दिवसातून फक्त दोनदाच जेवण करतो.
त्याचे जेवण खूप सोपे आणि निरोगी आहे. त्याच्या जेवणात स्प्राऊट्स, ग्रिल्ड चिकन, ब्रोकोली, सूप, कोशिंबीर, डाळ या पदार्थांचा समावेश असतो. तांदूळ, ब्रेड, साखर, बेकरीचे पदार्थ आणि दारूला तो पूर्णपणे टाळतो.
एका जुन्या मुलाखतीत त्याने त्याच्या आहाराबद्दल सांगितले होते, “मी बहुतेकदा खूप साधे अन्न खातो. मी दुपारी आणि रात्री, असे दिवसातून फक्त दोनदाच जेवतो. त्याशिवाय मी मधल्या काळात काहीही खात नाही. माझ्या जेवणात सहसा स्प्राऊट्स, ग्रील्ड चिकन, ब्रोकोली असतात. मी अनेक वर्षांपासून कोणताही बदल न करता, दररोज तेच खात आहे.”
जेव्हा बहुतेक लोक रात्री झोपतात तेव्हा शाहरुख खान काम करतो. त्याला रात्री काम करायला आवडते. चित्रपटाची पटकथा वाचणे असो, त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नियोजन करणे असो; शाहरुख रात्रीच्या शांत वातावरणात चांगले काम करू शकतो. कामाबद्दलचे त्याचे प्रेम आणि समर्पण याबद्दल, शाहरुख एकदा म्हणाला होता, “यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. फक्त मेहनत, जबरदस्त पॉझिटिव्ह दृष्टिकोन आणि न संपणारी इच्छाशक्ती हवी.” या सवयीमुळे तो आज बॉलीवूडचा ‘बादशाह’ बनला आहे.
तुम्हाला हे जाणून सर्वांत जास्त आश्चर्य वाटेल की, शाहरुख खान २४ तासांपैकी दोन-तीन तास बाथरूममध्ये घालवतो. त्याचे सेलिब्रिटी मित्र अनेकदा याबद्दल त्याची खिल्ली उडवतात आणि शाहरुखची ही विचित्र सवय चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या बाथरूममध्ये टीव्हीपासून फोनपर्यंत सर्व सुविधा आहेत. हा त्याचा ‘मी टाइम’ आहे.
सामान्य लोक सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करणे पसंत करतात; परंतु किंग खान रात्री व्यायाम करतो. तो एक तासाच्या व्यायामात १०० पुशअप्स आणि ६० पुलअप्स करतो. त्याशिवाय तो वेट ट्रेनिंग, कार्डिओ (धावणे, सायकलिंग) आणि इतर प्रकारचे व्यायामदेखील करतो. तो वर्कआउटनंतर प्रोटीन शेक पिण्यास कधीही विसरत नाही.
इतक्या व्यग्र दिनचर्येनंतरही शाहरुख खान त्याच्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतो. त्याला त्याच्या मुलांबरोबर दर्जेदार वेळ व्यतीत करायला आवडते. तो पत्नी गौरीबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा करतो.