अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरूय. नुकताच त्याचा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे रिव्यू सुद्धा उत्तम येऊ लागले आहेत. या चित्रपटात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकुर आणि परेश रावल सुद्धा दिसून आले. या चित्रपटात परेश रावल यांनी फरहान अख्तरसोबत बरीच धमाल केलीय. ‘तूफान’ चित्रपटात फरहान अख्तर एका अशा बॉक्सरच्या भूमिकेत दिसून आला जो सुरवातीला डोंगरीसारख्या वस्तीतील एक गुंडगीरी करणारा तरुण असतो. या चित्रपटावर आता बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरूख खानने रिव्यू दिलाय.

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानने नुकतंच रिलीज झालेला फरहान अख्तरचा ‘तूफान’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेता शाहरूख खान रिव्यू देणं मात्र विसरला नाही. या चित्रपटावरचा रिव्यू शाहरूख खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलाय. या चित्रपटाला त्याने ‘शानदार’ म्हटलंय. तसंच परेश रावल, मृणाल ठाकुर, मोहन अगाशे, हुसैन दलाल यांच्यासह ‘तूफान’ चित्रपटाच्या टीम मेंबर्सचं कौतुक देखील केलंय.

अभिनेता शाहरूख खानने त्याच्या या ट्विटमध्ये लिहिलं, “माझे मित्र फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मेहनतीला माझ्याकडून खूप सारं प्रेम…काही दिवसांपूर्वीच मला हा चित्रपट पहायला मिळाला. परेश रावल, मोहन अगाशे, मृणाल ठाकुर आणि हुसैन दलाल यांचा खूपच शानदार परफॉर्मन्स पहायला मिळाला. माझा रिव्यू- आपल्या सर्वांना ‘तूफान’ सारखे चित्रपट बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”

अभिनेता शाहरूख खानने शेअर केलेल्या या रिव्यूची पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. फरहान अख्तर हा एक उत्तम अभिनेता असून प्रत्येक भूमिकेसाठी तो मोठी मेहनत घेतो. त्याची हीच मेहनत तूफानमध्ये देखील दिसून आलीय. फरहानने त्याच्या शरीरावर आणि भाषेवर चांगलं काम केलंय. मुंबईतील टपोरी भाषा त्यांने चांगली पकडली आहे. सिनेमाच्या सुरुवातीला अति आक्रमक आणि अंगावर येणाऱ्या अज्जूची भूमिका नंतर मात्र स्थिरावते. या सिनेमाची कथा अतिशय वेगळी आहे अशातला भाग नाही. याआधी देखील अनेक हॉलिवूड तसचं बॉलिवूड सिनेमांमध्ये बॉक्सरच्या आयुष्यावरील कथा पाहिली गेलीय.

शाहरूख खानच्या बाबतीत सांगायचं झालं तर, त्याच्या सुद्धा ‘पठाण’ हा चित्रपट चर्चेत आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या या चित्रपटावर काम सुरूये आणि येत्या काळात हा चित्रपट मोठा धमाका करणार आहे. या चित्रपटात शाहरूख एका स्पायच्या भूमिकेत दिसून येणार आहे.