Shahid Kapoor Shared a Post on Wife Mira Rajput Birthday : शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलीवूडचं खूप लोकप्रिय कपल आहे. शाहिद आणि मीरा यांचं २०१५ मध्ये लग्न झालं आणि त्यांना दोन मुलं आहेत. आज, ७ सप्टेंबर रोजी अभिनेत्याची पत्नी मीरा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी शाहिदने तिच्यासाठी एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

मीरा राजपूतच्या वाढदिवशी शाहिद कपूरने तिच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये मीरा एकटीच पोज देताना दिसत होती. एका फोटोमध्ये शाहिद तिच्याबरोबर दिसत होता. या फोटोंबरोबर शाहिदने त्याच्या पत्नीसाठी एक खास नोटही लिहिली आहे.

काय म्हणाला शाहिद कपूर?

शाहिद कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये, तू मला पूर्ण केलेस. देवाने तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकलं. मी भाग्यवान आहे की तू आयुष्यभर माझ्याबरोबर राहशील. आनंदी राहा, निरोगी राहा, प्रत्येक संधीवर स्वतःला व्यक्त कर… तुला आवडेल त्या मार्गाने…तू नेहमी खूश राहा.”

शाहिदची पत्नी मीरा राजपूत काय करते?

मीरा राजपूत चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. ती एक यशस्वी व्यावसायिक महिलादेखील आहे. तिचा ‘अकाइंड’ नावाचा स्किनकेअर ब्रँडदेखील आहे, ज्यातून ती करोडो कमावते. मीरा आणि शाहिदचे २०१५ मध्ये लग्न झाले. हे जोडपे दोन मुलांचे पालक आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा.

शाहिदने लव्ह मॅरेज न करता आई-वडिलांच्या पसंतीनुसार अरेंज मॅरेज केलं. मीराशी लग्न करण्याआधी शाहिदचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. विशेषतः करीना कपूरबरोबरच्या त्याच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. २००४ मध्ये त्यांचे फोटो व्हायरल झाल्यावर त्यांच्या नात्याबद्दल अजूनच चर्चा रंगली. मात्र, जवळपास तीन वर्षांच्या नात्यानंतर २००७ मध्ये ते वेगळे झाले आणि आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्याकडे वळले.

शाहिद आणि मीरा यांनी फक्त तीन-चार वेळा भेटल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. १४ वर्षांच्या वयातील फरक असूनही, त्यांनी एकमेकांना समजून घेतलं आणि २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांचं नातं आणखी घट्ट झालं. आज शाहिद आणि मीरा बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या जोडप्यांपैकी एक आहेत.