‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिके त छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते शंतनू मोघे पुन्हा एकदा मालिकाविश्वात दिसणार आहेत. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अविनाश देशमुख म्हणून त्यांचा प्रवेश झाला असून मालिकेला नवे वळण मिळणार आहे.
या मालिकेत अनिरुद्ध देशमुखचा भाऊ आणि अरुंधती देशमुखचा धाकटा दीर अविनाश देशमुख कोण, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्याच्याविषयी बऱ्याचदा बोलले जायचे. त्याचा स्वभाव, त्याच्या चुका यावर मालिकेतून वारंवार भाष्य झाले आहे; परंतु कधीही हे पात्र समोर आले नव्हते. काही वर्षांपूर्वी कौटुंबिक वादातून त्याने घर सोडल्याचा दाखलाही आला आहे; पण अखेर अविनाश देशमुख कोण, ही उत्कंठा सरली आहे. अभिनेते शंतनू मोघे ही भूमिका साकारणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. विशेष म्हणजे अविनाश देशमुखांच्या घरात येऊन थेट आपल्या वहिनीसाठी म्हणजे अरुंधतीसाठी तो भावासमोर हात जोडतो आणि घरची लक्ष्मी घरातच राहायला हवी, अशी विनंती करतो. त्यामुळे मालिकेत आता मोठे वळण येणार आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेचा मी मोठा चाहता आहे. माझ्या घरातल्या सर्वांचीच ही आवडती मालिका असून या मालिकेत काम करायला मिळणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. या टीममध्ये मी जरी नवा असलो तरी मला तसे कुणी जाणवू दिले नाही. खूप प्रेमाने माझे स्वागत झाले. सुजाण कलाकार, उत्कृष्ट संवादलेखन आणि तितक्याच ताकदीचे दिग्दर्शन यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अविनाश या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचे तर १५ वर्षांपूर्वी त्याने देशमुखांचे घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. वैचारिक मतभेदांमुळेच अविनाशने हा निर्णय घेतला. मात्र आता हसतेखेळते कुटुंब दुभंगणार हे कळल्यावर त्याची पावले पुन्हा एकदा घराकडे वळली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने एका छान कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळाली, अशी भावना शंतनू मोघे यांनी व्यक्त केली.