Marathi Actor Sharad Ponkshe : प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी नुकतीच भाजपा म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपाचा आणि पंतप्रधान मोदींचा भक्त असल्याचं वक्तव्य केलं. मागाठाणे या ठिकाणी झालेल्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी भाजपा आणि मोदींबाबत हे विधान केलं होतं. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. या वक्तव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली, अजूनही आहे.
महेश कोठारेंनी मोदी आणि भाजपाबाबत केलेल्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. महेश कोठारे अशीच वक्तव्यं करत राहिले, तर तात्या विंचू येऊन त्यांना चावेल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. ज्यावर मराठी अभिनेत्री मेघा धाडेनं एक पोस्ट शेअर करीत तिची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत मेघा म्हणाली, “अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने उद्धव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजपा प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती, तरी कोणी आक्षेप घेतला नाही; परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या. कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली, त्यांच्या मराठीपणावरदेखील शंका घेण्यात आली.”
यानंतर ती पोस्टमध्ये म्हणाली, “हे असे झाले, कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले. कोणत्या तिकिटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाहीत. एका सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे, जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा… तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास करतोय, जो मुंबईकर आधी ट्रॅफिकमध्ये अडकायचा, आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय; त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली आणि हे सत्यातदेखील उतरणार आहे.”
मेघा धाडेच्या पोस्टवरील शरद पोंक्षेंची कमेंट

मेघाच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनीसुद्धा कमेंटद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे. शरद पोंक्षे म्हणतात, “मी मोदींचं कौतुक करतो, अमित शहांचंही कौतुक करतो. जे जे चांगले आहेत त्यांचं कौतुक करतो. सद्य परिस्थितीत भाजपाशिवाय देशाला पर्याय नाही, हे माझं मत मी मांडलं. द्या किती शिव्या द्यायच्यात त्या…”
दरम्यान, शरद पोंक्षे हे मराठी मनोरंजन विश्वातले लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर अनेक मराठी, मालिका आणि सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयासह ते सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांची राजकीय आणि सामाजिक मतं व्यक्त करीत असतात. अशातच त्यांनी मेघा धाडेच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
