Saif Ali Khan refused to meet mom Sharmila Tagore : शर्मिला टागोर यांनी त्यांच्या काळात अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे सगळेच वेडे होते.
शर्मिला अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्या लग्नानंतरही काम करीत राहिल्या आणि मुले झाल्यानंतरही त्यांनी ब्रेक घेतला नाही. तर त्या काळात अनेक अभिनेत्री लग्नानंतर वा मुले झाल्यानंतर काम करीत नव्हत्या.
आता शर्मिला टागोर यांची मुलगी सोहा सोहा अली खान हिने सांगितले की, त्या एकीकडे काम करायच्या; पण त्यामुळे त्यांना त्यांचा मुलगा सैफची नाराजी सहन करावी लागत होती.
शर्मिला कामामुळे घरापासून दूर राहत असे
सोहाने हॉलीवूड रिपोर्टरशी बोलताना मनोरंजन क्षेत्रातील अशा महिलांबद्दल सांगितले, ज्या कामाचे जीवन आणि मातृत्वाच्या जबाबदाऱ्या यांमध्ये संतुलन साधतात. तिने तिच्या आईच्या आयुष्याबद्दलही सांगितले आहे. ती म्हणाली की, सैफ लहान असताना शर्मिला पूर्णवेळ काम करायच्या. बऱ्याचदा त्या सैफला एकेक आठवडा पाहू शकत नव्हत्या आणि सैफ त्यामुळे खूप नाराज असायचा.
सोहा म्हणाली, “बऱ्याचदा मम्मी सैफला एकेक आठवडा पाहू शकत नव्हती. ती घरी आली की, लगेच सैफकडे जायची आणि त्याच्याबरोबर झोपायची. पण तो रागावून म्हणायचा की, मला तुझी गरज नाही. मला तू नकोय. तो दीदी (नॅनी)बरोबर चांगला राहत असे.”
सोहा म्हणाली की, मला आईंबद्दल, विशेषतः नवीन आईंबद्दल खूप करुणा आहे. मला वाटते की, बाळाचं संगोपन करणं खूप आव्हानात्मक आहे. तिच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलताना सोहा म्हणाली की, एकदा ती सेटवर अस्वस्थ होऊ लागली. कारण- तिनं दिवसभर तिच्या मुलीला पाहिलं नव्हतं. सोहा पुढे म्हणाली की, मी कुठेही असले तरी ७ वाजताच मला विचित्र वाटू लागते. कारण ती तिची (मुलीची) झोपण्याची वेळ आहे. जेव्हा माझी राजस्थानमध्ये शूटिंग सुरू होती, तेव्हा तिच्या झोपण्याची वेळ झाली होती आणि मी तिला दिवसभर पाहिले नव्हते, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले.
यापूर्वी शर्मिला एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या, “मी दिवसातून दोन शिफ्टमध्ये काम करायचे आणि सहा वर्षे मी कुटुंबासाठी पूर्णपणे गैरहजर होते. मी असे म्हणू शकत नाही की, मी पूर्णवेळ आई होते. माझा नवरा मुलांबरोबर होता; पण मी नाही.”
शर्मिला टागोर यांचे नाव बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले. ‘अपूर संसार’मधून लोकप्रियता मिळवल्यानंतर त्यांनी ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘मौसम’ व ‘काश्मीर की कली’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. आजही त्यांच्या उत्कृष्ट चित्रपटांची चर्चा चित्रपटप्रेमींमध्ये केली जाते. तरुण पिढीमध्येही त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यात यश मिळवले आहे.