Sheeba Chadha on Kids and Parenting : बॉलीवूडपासून ते टीव्हीपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याने लोकांचे मनोरंजन करणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत सलमान आणि शाहरुख खानबरोबर चित्रपटांमध्ये काम केले आहे. या अभिनेत्रीने पडद्यावर आई, बहीण आणि पत्नीच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत.

याशिवाय त्यांनी ओटीटीमध्येही धुमाकूळ घातला आहे. त्या अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’मध्येही दिसल्या आहेत. पण, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. एकटी आई म्हणून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. आता अलीकडेच याबद्दल त्या बोलल्या आहेत.

आम्ही ‘हम दिल दे चुके सनम’, ‘दिल्ली ६’, ‘गली बॉय’, ‘मर्डर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री शीबा चढ्ढाबद्दल बोलत आहोत. त्यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे. या मुलाखतीत शिबा यांनी सध्याच्या काळात मूल जन्माला घालणं का कठीण आहे हे सांगितलं आहे. शिबा म्हणाल्या,”सिंगल आई होणं खूप कठीण आहे. अनेक बाजूंनी हे अवघड असतं. काहीही झालं तरी तुम्हाला बाळासाठी त्याक्षणी हजर राहावं लागतं. मी प्रत्येक सिंगल आईचं दुःख समजू शकते. पूर्वी पूर्ण गाव तुमच्या बाळाची काळजी घ्यायचं. परंतु, कुटुंब छोटं होत गेलं तशी समस्या आणखी वाढली. माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी मी अनेक चांगल्या ऑफर्स नाकारल्या.”

शिबा पुढे म्हणाल्या, “मला वाटतं सध्याच्या काळात मूल जन्माला घालूच नये. या काळात बाळाला एकट्याने सांभाळणं खूप कठीण गोष्ट आहे. अनेकदा आई-बाबा दोघांचा पगार कमी पडतो. आपण मुलं का जन्माला घालतो, याचा विचार लोकांनी खोलवर करायला हवा. फक्त समाज काय म्हणेल किंवा आईबाप व्हायचंच आहे या हेतूने मूल जन्माला घालणं चुकीचं आहे. त्यांच्या मते, सध्याच्या जगात मुलांना वाढवणे अधिक कठीण झाले आहे. महागाई, बदलती जीवनशैली, कुटुंबातील तणाव आणि एकटेपणा यामुळे आजच्या पालकांनी जबाबदारी घेऊनच मूल जन्माला घालावे.”

शीबा चढ्ढा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या शेवटच्या अमित गुप्ता दिग्दर्शित कॉमेडी-ड्रामा वेब सीरिज ‘बकैती’मध्ये दिसल्या होत्या, जी OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर प्रदर्शित झाली होती. त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर त्या नितेश तिवारीच्या ‘रामायण’ चित्रपटात मंथराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर रामाची भूमिका साकारत आहे. त्याचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.