बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपत नाही. मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी शिल्पा शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. तिने नुकतंच ट्वीट करत याबद्दल भाष्य केले आहे.

शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया

शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने म्हटले आहे की, “मी सकाळी उठल्यावर मला कळले की माझ्या आणि राजविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हे सर्व ऐकून मला धक्का बसला. SFL फिटनेस ही एक कंपनी असून याचा सर्वेसर्वा हा काशिफ खान आहे. ही संपूर्ण कंपनी तो एकटा चालवत होता. या ब्रँडच्या नावाने देशभरात फिटनेस जिम उघडण्याचे संपूर्ण अधिकार त्याने घेतले होते. तसेच याबाबत सर्व करारांवर तो स्वाक्षरी करायचा. त्याच्याकडे बँकिंग आणि इतर नियमित कामाची जबाबदारही त्याच्यावर होती. त्यामुळे त्याच्या कोणत्याही व्यवहाराची आम्हाला माहिती नाही. तसेच आम्ही त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेतलेले नाहीत. या सर्व फ्रँचायझी थेट काशिफ खानकडून घेता येतात. ही कंपनी २०१४ मध्ये बंद झाली असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही काशिफ खान यांनी घेतली होती,” असे तिने सांगितले.

“मी गेल्या २८ वर्षांपासून फार मेहनत घेत आहे. मात्र इतक्या सहज माझे नाव, माझी प्रतिष्ठा खराब होत असल्याचे पाहून मला फार दु:ख होत आहे. मी कायद्याचे पालन करणार्‍या आणि आदर करणार्‍या देशाची अभिमानास्पद नागरिक आहे. त्यामुळे मला माझ्या अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे,” असे तिने यात म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि काशिफ खान यांच्याविरोधात हा फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण २०१४ मधील आहे. प्रसिद्ध व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार, राज आणि शिल्पा यांनी त्या संबंधित व्यावसायिकाकडून यांची एक कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे.

त्या व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी मला फिटनेस संबंधित एका व्यवसायात १ कोटी ५१ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते. ही गुंतवणूक केल्यानंतर काही वर्षांनी याबाबत काहीही सुरळीत न झाल्याने मी त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्यांनी मला धमकी दिली, असा आरोप त्याने केला आहे.

चौकशीची शक्यता

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४, १२०(ब) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे.