गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरीही दरवर्षी गणरायाचं आगमन होतं. मोठ्या उत्साहात शिल्पा आणि राज कुटुंबीयांसह गणेशोत्सव साजरा करतात.

पण, या वर्षी मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरी बाप्पा विराजमान होणार नाहीत. यामागचं कारण अभिनेत्रीनं सांगितलं आहे. शिल्पा शेट्टीनं सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टी काय म्हणाली?

शिल्पा शेट्टीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिनं या वर्षी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. कुंद्रा कुटुंबातील नातेवाइकाचं निधन झाल्यानं या वर्षी शिल्पा शेट्टीला गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. “मित्रांनो, तुम्हाला कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की, कुटुंबातील दुखवट्यामुळे या वर्षी आम्ही गणपती उत्सव साजरा करणार नाही. परंपरेनुसार, आम्ही १३ दिवसांचं सुतक पाळत आहोत आणि म्हणून कोणताही धार्मिक उत्सव घरात साजरा होणार नाही, असं तिनं म्हटलंय. शिल्पानं कुंद्रा कुटुंबाच्या वतीनं ही पोस्ट शेअर केली आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. वाजत-गाजत त्यांच्या घरी गणरायाचं आगमन होतं. शिल्पा जेव्हा गणपतीची मूर्ती आणण्यासाठी जाते तेव्हा फोटोग्राफर्सचीदेखील गर्दी होते. या दिवसांमध्ये शिल्पा शेट्टीच्या घरी पूजापाठ आयोजित केली जाते. तसेच मोठ्या भक्तिभावाने ते गणरायाला निरोप देतात. पण, यंदा मात्र ते गणेशोत्सव साजरा करणार नाहीत.

शिल्पा शेट्टी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत शिल्पानं अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण, बॉलीवूडमध्ये करिअर करीत असताना शिल्पा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळेही तुफान चर्चेत राहिली. आज शिल्पा उद्योजक राज कुंद्रा याच्याबरोबर आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.