एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं आणि म्हणूनच २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका तुफान लोकप्रिय झाली आणि अजरामर ठरली. आता ही मालिका लॉकडाउनच्या काळात पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातच शलाका टिपरे ही भूमिका साकारणारी रेश्मा नाईक ही अभिनेत्री प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेतले बहुतांश कलाकार आजही मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. पण, टिपरेंची नात शलाका नेमकं काय करतेय असा प्रश्न कदाचित प्रेक्षकांना पडला असेल.

शलाका म्हणजेच अभिनेत्री रेश्मा नाईक ही मनोरंजन क्षेत्रापासून थोडी अलिप्त असल्याचं दिसून आलं. ती सध्या आपल्या कुटुंबात रमली आहे. रेश्माचे लग्न झाले असून तिला एक मुलगाही आहे. मुलाच्या संगोपनाकडे ती पूर्णपणे लक्ष देतेय. मालिकेचं झी मराठीवर फेरप्रक्षेपण होणार असं कळल्यावर रेश्मादेखील भूतकाळात रमली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालिकेच्या आठवणी सांगताना ती म्हणाली, की “चित्रीकरणाला जाताना मला वाटायचं की, मी एका घरातून दुसऱ्या घरी जातेय. टिपरे कुटुंबदेखील माझं दुसरं घरच होतं. जसं मी माझ्या घरी असायचे तसंच सेटवर असायचे. आई-बाबा, भाऊ आणि आजोबा असं आमचं टिपरे कुटुंब मला माझ्या खऱ्याखुऱ्या कुटुंबाप्रमाणेच भासायचं. माझा सख्खा भाऊ माझ्याहून एक वर्ष मोठा आहे. त्यामुळे मालिकेत शिऱ्या आणि मी ज्याप्रमाणे एकमेकांच्या खोड्या काढायचो; तसंच ते आमच्या घरीसुद्धा असायचं. टिपरे कुटुंबातील आजोबांप्रमाणे आमच्या घरी माझी आजी असायची, आम्हा सर्वांना सांभाळून घेणारी.”