मोठमोठ्या कंपन्या आपल्या उत्पादनाच्या जाहिरातींसाठी प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूंचा वापर करतात. या जाहिराती लोकांमध्ये खूप लोकप्रिय असतात आणि क्रिकेटपटूंशी संबंधित असल्यामुळं त्यांची ब्रँड व्हॅल्यूही वाढते. भारतीय संघातील बहुतेक सगळेच खेळाडू अशा जाहिराती करतात. यापैकीच एक खेळाडू म्हणजे विराट कोहली. विराट कोहलीने आजवर अनेक जाहिरातींसाठी काम केलं आहे. शिवाय अनेक उत्पादनांचा तो ब्रॅंड ॲम्बेसेडरही राहिला आहे. अशातच विराटने नुकतीच एक नवीन जाहिरात केली आहे.

विराटच्या या जाहिरातीत त्याच्याबरोबर एक मराठमोळी अभिनेत्रीही झळकली आहे, ही अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे. झी मराठीवर २०१२ मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे श्रुतीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने काही मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शिवाय अभिनेत्री काही जाहिरातींमध्येही झळकली आहे. अशातच तिने विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांच्याबरोबर जाहिरात केली आहे.

श्रुतीने विराट आणि कृणालसह केलेल्या जाहिरातीचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत श्रुतीने या जाहिरातीत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. नवशक्तीबरोबर साधलेल्या संवादात श्रुती म्हणाली की, “विराट कोहलीबरोबर जाहिरात करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता. मला वाटलं होतं की, विराट कोहलीबरोबर जाहिरात करताना खूप नियम आणि सुरक्षा असेल किंवा पटापट शूटिंग करून त्यांना जाउद्या असं असू शकेल. पण तो खूपच शांत आणि संयमी होता.”

यानंतर श्रुती म्हणाली, “कृणाल पांड्या आणि विराट कोहली अगदी आरामात गप्पा मारत होते. ते एका मीमवर गप्पा मारत होते. सोशल मीडियावर काय चालू आहे? आपल्याबद्दल काय लिहिलं जातंय? कोणती मीम व्हायरल झाली आहे? काय ट्रेंड सुरू आहे? या सगळ्याकडे त्यांचं लक्ष असतं. ऑन कॅमेरा काम करण्याचा अनुभवही खूप छान होता. जाहिरातीमध्ये खूप रिटेक्स होत असतात. पण कोणीच कंटाळलं नाही. कारण त्यांनी आतापर्यंत इतक्या जाहिराती केल्या आहेत की, आता ते चांगलेच तरबेज झाले आहेत.”

यानंतर श्रुती गंमतीत म्हणाली, “मला सुरुवातीला खुप टेन्शन आलं होतं की, आता विराट असल्यामुळे आपल्याला काही काम असेल की नसेल? पण त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप भारी होता.” यानंतर श्रुतीने तिचा पती गौरव घाटणेकरदेखील काही जाहिरातीत काम केल्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी ती म्हणाली की, “काही जाहिरातीत प्रामुख्याने मी आहे, तर काहींमध्ये गौरव आहे. आम्ही दोघेही क्रिकेटचे चाहते आहोत. दोघांना क्रिकेट पाहायला आवडतं. आम्ही भारताचे इतर देशांबरोबरचे अनेक सामने पाहतो आणि एन्जॉय करतो.”