‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधून घराघरात पोहचलेली गोलू म्हणजेच श्वेता त्रिपाठीचा आज वाढदिवस आहे. श्वेताने सिनेमा आणि वेब सीरिजमधून हटके भूमिका साकारत तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मात्र इथवर पोहचण्यासाठी श्वेताला काही अडचणींचा सामना करावा लागला होता. वेगवेगळ्या नोकऱ्या केल्यानंतर श्वेताने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज श्वेताच्या वाढदिवसानिमित्ताने आपण तिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

श्वेता त्रिपाठीने २०११ सालामध्ये आलेल्या ‘त्रिश्ना’ सिनेमातून अभिनयाला सुरुवात केली. मात्र या सिनेमाने तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. तर २०१५ सालामध्ये आलेल्या ‘मसान’ सिनेमातील भूमिकेमुळे श्वेता त्रिपाठी आणि विकी कौशल दोघांनाही चांगलीच पसंती मिळाली. या सिनेमातील श्वेता त्रिपाठीच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. तर त्यानंतर आलेल्या ‘मिर्झापूर’ वेब सीरिजमधून श्वेता गोलू गुप्ता म्हणून लोकप्रिय झाली. गोलू गुप्ता या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिकंली. इथपर्यंतचा प्रवास श्वेतासाठी सोपा नव्हता.

‘शक्तिमान’ आता मोठ्या पडद्यावर, सुपरहिरोच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला ऑफर

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी श्वेताने विविध नोकऱ्या केल्या. श्वेताने फॅशन कम्युनिकेशन कोर्सला प्रवेश घेतला होता. मात्र यावेळीचं तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिने दिल्ली सोडलं आणि ती मुंबईला आली. सुरुवातीला श्वेताने फॅमिना मासिकामध्ये फोटो एडिटरची नोकरी केली. त्यानंतर एका प्रोडक्शन हाउसमध्ये देखील तिने नोकरी केली. काही काळ असोसिएट डायरेक्टर आणि प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केल्यानंतर श्वेताने स्वत:ची थिएटर कंपनी सुरु केली. श्वेताच्या या कंपनीचं नाव ‘ऑल माय टी प्रोडक्शन’ असं आहे. श्वेताला ‘त्रिश्ना’ सिनेमामध्ये पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर मसान तसंच ‘हरामखोर’, ‘गॉन केश’, ‘रात अकेली है’ अशा विविध सिनेमांमध्ये काम केलं.

तसचं श्वेताने ‘मिर्झापूर’, ‘क्या मस्त है लाइफ’, ‘मेड इन हेवन’, ‘लाखो मे एक’ आणि ‘गॉन केस’ अशा वेब सीरिजमधून ती वेगवेगळ्या भूमिकांमधून झळकली. श्वेताने कथक आणि भरतनाट्यमचंही प्रशिक्षण घेतलंय.