‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी क्लासिक चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजेच ‘लाल सिंग चड्ढा’ नुकताच प्रदर्शित झाला. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. आमिर खानबरोबर करीना कपूरही या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला पण त्याआधीपासूनच बॉयकॉट ट्रेंडमुळे या चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. आमिरच्या गेल्या १० वर्षांच्या करकीर्दीतला हा सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आमिरच्या सिनेमाची कुठेच जास्त हवा नसली तरी मुळ सिनेमा म्हणजेच फॉरेस्ट गंप सध्या Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ नंबरवर ट्रेंड होतोय!

‘फॉरेस्ट गंप’ची कथा ही बुध्यांक कमी असलेल्या एका असामान्य व्यक्तिची आहे. तसेच या चित्रपटात त्या व्यक्तिबरोबर अमेरिका या देशाचा प्रवाससुद्धा मांडलेला आहे. अमेरिकेतल्या मुख्य राजकीय तसेच सामाजिक घडामोडी आणि त्यासोबत फॉरेस्ट गंप या व्यक्तीचं जीवन या चित्रपटात उलगडतं. या चित्रपटाला भारतीय साच्यात बसवण्यात लेखक अतुल कुलकर्णी यांना चांगलंच यश आलं आहे. अमेरिकेतल्या राजकीय तसेच सामाजिक घटना आणि ‘लाल सिंग चड्ढा’ मधील राजकीय, सामाजिक घटना यांच्यात नेमकं काय साम्य आहे ते जाणून घेऊयात.

मुळ इंग्रजी चित्रपटात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष J.F.Kennedy यांची हत्या आणि त्यानंतरचं ढवळून निघालेलं सामाजिक वातावरण दाखवण्यात आलं आहे. तर ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतर देशात झालेला शिखांचा नरसंहार दाखवण्यात आलेला आहे. फॉरेस्ट गंपमध्ये व्हिएतनाम युद्धाची झलक आपल्याला बघायला मिळते तर लाल सिंग चड्ढामध्ये कारगिल युद्धाची पार्श्वभूमी दाखवली गेली आहे.

‘फॉरेस्ट गंप’मध्ये त्याकाळातला स्टार Elvis Presley आणि त्याच्या नृत्यकौशल्याची झलक दाखवली गेली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये मात्र त्याऐवजी सुपरस्टार किंग खान शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतो.

आणखी वाचा : “चित्रपटावर बहिष्कार टाकू नका कारण…” ‘लाल सिंग चड्ढा’ला थंड प्रतिसाद मिळताच करीना कपूरचं प्रेक्षकांना आवाहन

एकूणच अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये साम्य आढळून आले आहे. ‘फॉरेस्ट गंप’मध्ये जितकं अचूक सामाजिक आणि राजकीय घटनांचं चित्रण केलं गेलं आहे तितकंच अचूक भारतीय घडामोडींचं चित्रण करायचा प्रयत्न ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये करायचा प्रयत्न केला आहे. लेखक अतुल कुलकर्णी यांनी त्या सगळ्या घटना अचूक पटकथेत पेरल्या आहेत. या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी आमिर खानला तब्बल ८ वर्षं लागली. १४ वर्षांच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीनंतर हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.