लोकप्रिय गायक व संगीतकार अदनान सामी हा त्याच्या कर्णमधुर सुरेख अशा गायनासाठी ओळखला जातो. ‘तेरा चेहरा’, ‘लिफ्ट करा दे’, ‘माहिया’ यांसारख्या गाण्यांद्वारे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या पाकिस्तानातील अदनाने २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले.
आता अलीकडेच एका मुलाखतीत त्याने सांगितले की, त्याला पाकिस्तानात राहणाऱ्या त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली नव्हती. पाकिस्तानने त्याचा व्हिसा नाकारला होता.
अदनान म्हणाला की, त्याच्या आईच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला होता. कारण- त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. त्याने सांगितले की भारतीय अधिकाऱ्यांना त्याची परिस्थिती लगेच कशी समजली. अदनान म्हणाला, “मी येथील सरकारला विचारले की, जर मला जायचे असेल, तर तुम्हाला काही आक्षेप आहे का?” त्यावर ते अधिकारी म्हणाले “तुमच्या आईचे निधन झाले आहे. तुम्हाला जावे लागेल.” त्यांच्याकडून कोणतीही समस्या आली नाही.
इंडिया टीव्हीशी बोलताना अदनान सामीने सांगितले की, ऑक्टोबर २०२४ मध्ये जेव्हा त्याच्या आईचे निधन झाले तेव्हा त्याने अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला होता. अदनान म्हणाला की, भारत सरकारने त्याची परिस्थिती लगेच समजून घेतली आणि त्याला जाण्याची परवानगी दिली; पण जेव्हा त्याने पाकिस्तानमध्ये व्हिसासाठी अर्ज केला तेव्हा तिथून त्याचा व्हिसा नाकारण्यात आला. गायक म्हणाला, “मी व्हिसासाठी अर्ज केला होता; पण त्यांनी नकार दिला. मी म्हणालो की, माझ्या आईचं निधन झालं आहे. तरीही त्यांनी मला व्हिसा दिला नाही. मी जाऊ शकलो नाही. मी माझ्या आईचा अंत्यसंस्कार व्हॉट्सअॅपवरील व्हिडीओद्वारे पाहिला.”
त्याच संभाषणात, अदनान सामीला विचारण्यात आले की, त्याने भारतीय नागरिकत्व घेतले कारण- तो पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त कमाई करीत होता. त्यावर उत्तरादाखल तो म्हणाला की, तो भाग्यवान आहे की, तो एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आला, जिथे त्याला कधीही पैशाची चिंता करावी लागली नाही. त्याने कधीही फक्त पैशासाठी काहीही केले नाही. त्याऐवजी त्याने त्याची कोट्यवधींची मालमत्ता पाकिस्तानात सोडली आणि भारतात कारकिर्दीला सुरुवात केली.