Sanju Rathod Struggle Story : संजू राठोड हे मराठी तरुणांमधील लोकप्रिय नाव. त्याने आजवर अनेक गाणी गायली आहेत. या गाण्यांतून त्याने अनेकांची विशेष करून तरुण पिढीतील मुलांची मनं जिंकली. पण, तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आला ते त्याच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे. अशातच आता त्याने मुलाखत दिली असून यामध्ये त्याने त्याच्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
कलाकारांना प्रसिद्धी फुकट मिळत नाही, त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते असं म्हटलं जातं. असंच काहीसं संजू राठोडच्या बाबतीतही झालं. आज संजू राठोडचे जगभरात चाहते आहेत. परदेशातही त्याच्या गाण्यांची क्रेझ आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा तो अक्षरश: रेल्वे स्थानकावर झोपायचा. संजूने याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
१५ दिवस रेल्वे स्थानकावर झोपलो – संजू राठोड
‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीत संजू म्हणाला, “माझ्यावर कर्ज होतं. मी मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. मी १५ दिवस रेल्वे स्थानकावर झोपलो. तेव्हा माझ्याकडे फक्त एक ब्लँकेट होतं. त्यावेळी माझा फोन हरवला आणि मी पाच ते सहा महिने फोनशिवाय राहत होतो.”
गाणी बनवण्यासाठी घेतलेल्या कर्जाबद्दल संजू पुढे म्हणाला, “सुरुवातीला मी दरवर्षी गणपती बाप्पासाठी गाणी गायचो. यूट्यूब आज आहे तितकं लोकप्रिय नसतानाही त्यावेळी माझ्या गाण्यांना यूट्यूबवर १०-१५ मिलियनमध्ये व्ह्युज असायचे. मला तेव्हा यूट्यूबद्दल फार माहीत नव्हतं आणि माझं अकाउंटही नव्हतं. मी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून लोन घ्यायचो. माझे व्हिडीओ व्हायरल व्हायचे आणि लोक म्हणायचे बघा हा किती पैसे कमावतोय. पण, सत्य हे होतं की मी संघर्ष करत होतो.”
संजू पुढे म्हणाला, “लोक माझ्या घराबाहेर येऊन मला त्रास द्यायचे. मी तेव्हा टॅरेसवर, पाण्याच्या टाकीमागे लपून बसायचो आणि कधी कधी तर तिथून खाली उडी मारून जायचो. असं मी अनेकदा केलं आहे. पण, आता ते सगळं विसरले आहेत.”
संजू् राठोड त्याच्या मराठी गाण्यांसाठी ओळखला जायचा. परंतु, तो देशभरात लोकप्रिय झाला ते २०२४ मध्ये आलेल्या त्याच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्यामुळे. यानंतर त्याचं ‘शेकी शेकी’ हे गाणंदेखील खूप गाजलं.
महाराष्ट्रातील जळगाव येथील धनवड (Dhanwad) गावातून आलेल्या संजूला आज देशभरात अनेक जण त्याच्या गाण्यांसाठी ओळखतात, त्याच्यावर प्रेम करतात. संजू राठोडने मेहनतीने हे सगळं कमावलं असून आज त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.