Soha Ali Khan on her bond with brother Saif Ali Khan : सोहा अली खान आणि तिचा भाऊ सैफ यांच्या वयात खूप अंतर आहे. सोहाने यापूर्वी खुलासा केला आहे की, ती लहानपणी सैफबरोबर जास्त वेळ घालवत नव्हती; परंतु जसजसे ते मोठे होत गेले तसतसे त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. एका मुलाखतीत सोहाने सांगितले की, सैफ लहानपणी किती मस्तीखोर होता.
‘मॅशेबल इंडिया’च्या यूट्यूब चॅनेलवर सोहाने सैफबरोबरच्या तिच्या बालपणीची कहाणी शेअर केली. ती म्हणाली, “माझ्या आणि माझ्या भावाच्या वयात नऊ वर्षांचं अंतर आहे, जो खूप मोठा आहे. जेव्हा मी जन्मले तेव्हा तो शिक्षणासाठी परदेशात गेला होता. तो परत आल्यावर त्यानं चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मी ऑक्सफर्डला शिक्षणासाठी गेले. आम्ही मुंबईत राहायला आलो तेव्हाच आम्ही एकत्र वेळ घालवू लागलो आणि जवळीक वाढली.”
सैफ रात्री पळून जायचा : सोहा अली खान
सोहा म्हणाली, “मी मोठी होत असताना तो म्हणजे माझ्यासाठी एक गूढ होतं. कारण- तो विंचेस्टरमध्ये शिकत होता आणि फक्त सुटीच्या वेळी तो घरी येत असे. तो त्याला जे हवे ते करायचा. लहानपणी तो एक बिघडलेला मुलगा होता आणि माझे आई-वडील त्याचं उदाहरण देऊन म्हणायचे की, काय करू नये. मला मिळालेली खोली प्रत्यक्षात त्याची होती; पण तो आल्यावर मला तिथे झोपण्याची परवानगी नव्हती. कारण- तो अनेकदा रात्री खिडकीतून उडी मारून पळून जायचा आणि उशिरा घरी परत यायचा.”
सोहा पुढे म्हणाली, “तो (सैफ) खूप गोष्टी करायचा आणि माझे आई-वडील मला त्याच्या खोलीत झोपू देत नसत. कारण- त्यांना वाटायचे की, मी त्याच्यासारखी दिसते आणि कदाचित त्याच्यासारखीच होईन. माझ्या बहिणी नेहमीच माझ्या भावाची घरी येण्याची वाट बघायच्या. तो कसा दिसेल हे आम्हाला कधीच माहीत नव्हते. कधी त्याचे केस लाल असायचे, कधी सोनेरी असायचे, तर कधी लांब असायचे.”
सोहा अली खान आता सिनेमांमध्ये फारशी दिसत नसली तरी ती आता लेखक म्हणून नावारूपास आली आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या शोमध्ये ती फॅशन वॉक करतानाही दिसत असते. सोहा अली खान अलीकडेच ‘छोरी 2’मध्ये नुसरत भरुचा, गश्मीर महाजनी व जितेंद्र कुमार यांच्याबरोबर दिसली होती. हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा होता, जो अमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. ‘छोरी’ चित्रपटातून सोहा सात वर्षांच्या ब्रेकनंतर अभिनय क्षेत्रात परतली आहे. ती शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहेब बीवी और गँगस्टर ३’मध्ये दिसली होती.